लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे.बल्लापूर शहराच्या मध्यभागातून रेल्वे लाईन गेली आहे. या रेल्वेलाईनमुळे वस्ती विभाग आणि डेपो तथा टेकडी भाग अशा दोन भागात हे शहर आहे. या दोन्ही विभागाला रहदारीने जोडण्याकरिता रेल्वे स्थानकाच्या बाजूला लोखंडी उड्डाणपूल सुमारे ४० वर्षापूर्वी बांधण्यात आले. या पुलावरून रात्रंदिवस लोकांची ये-जा असते. शहरातील अत्यंत महत्त्वाचे हे रहदारीचे ठिकाण आहे.पूल जीर्णावस्थेत आल्यामुळे रेल्वे विभागाने या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. या दुरूस्तीवर एकूण ५० लाख रूपये खर्च होणार आहेत. हा खर्च रेल्वे विभाग २५ लाख आणि बल्लारपूर नगर परिषद २५ लाख रूपये खर्च करीत आहे. पुलाच्या दुरूस्तीचे सुमारे ८० टक्के काम झाले आहे. केवळ वस्ती भागातील पुलाच्या उतार भागाला तोडून तो नव्याने बांधणे बाकी आहे. पुलाच्या जुन्या उतार भागाला तोडून तीन नवीन पिल्लरही उभे करण्यात आले आहेत. परंतु, उतार भागातील जवळपासच्या रहिवाशांनी या कामाला आक्षेप घेत, उतारभाग आमच्या घरासमोर नको, अशी मागणी करीत कामाला विरोध दर्शविला आहे.तसे निवेदन येथील रहिवाशांनी नगर परिषद तसेच रेल्वेच्या संबंधित विभागाकडे दिले आहे. पुलाला उतार भाग न ठेवता, आमच्या घरासमोरील जागा बाधित होऊ नये, याकरिता रेल्वेच्या हद्दीतच पुलाच्या शेवटच्या टोकाला पायऱ्या बनविण्यात याव्यात, असे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पुलाचा उतार पूर्वीसारखाच ठेवण्यात यावा, अशी काही जणांची मागणी आहे. परस्पर विरूद्ध असलेल्या लोकांच्या या मागणीच्या पेचात रेल्वे विभाग आणि नगर परिषद प्रशासन सापडले आहे.परिणामी या पुलाचे काम अर्धवट पडले आहे. पावसाळ्यात वर्धा नदीच्या पुराचे पाणी शहरातील मुख्य मार्ग असलेल्या कॉलरी रोड तसेच रेल्वेच्या गोल पुलात घुसले की रहदारी बंद होते. अशाप्रसंगी सध्या दुरूस्तीत असलेले रेल्वे उड्डाण पुलच एक पर्याय उरतो. मोठा पाऊस होवून पुराचे पाणी गोल पुलात घुसले तर रहदारीचा प्रश्न शहरवासीयांपुढे उभा राहू शकतो. त्यामुळे काम लवकर पूर्ण करावे.विद्यार्थ्यांना अडचणीबल्लारपूर शहरातील शाळा तसेच महाविद्यालय वस्ती विभाग आणि डेपो विभाग या दोन्ही भागात आहे. त्यामुळे या पुलावरून विद्यार्थ्यांची दिवसभर ये-जा सुरू असते. शाळा-महाविद्यालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या संपण्याआधीच या पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र पुलाचे काम रखडल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण येत आहे.
वादात अडकले रेल्वे उड्डाणपुलाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:45 PM
येथील रेल्वे उड्डाण पुलाची दुरूस्ती केली जात आहे. दुरूस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करायला हवे होते. मात्र पुलाच्या वस्ती भागातील उतार कामाला रहिवाशांनी आक्षेप घेतल्याने या पुलाचे काम सुमारे महिनाभरापासून बंद आहे.
ठळक मुद्देबल्लारपूर शहर : रहिवाशांचा उतार कामाला आक्षेप