ग्रामस्थांची मागणी : चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करा भेजगाव : मूल पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या भेजगाव येथे शेकडो वर्षापूर्वी बांधलेली शाळेची इमारत जीर्ण झाल्याने त्याच ठिकाणी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानाच्या डावी कडवी योजनेअंतर्गत जवळपास १७ लाख रुपये खर्च करुन दुमजली तीन वर्गखोलीचे बांधकाम पूर्ण केले. मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर बांधकाम चंद्रपूर येथील कंत्राटदारामार्फत करण्यात आले असून अंदाजपत्रकानुसार सिमेंट, लोहा, वापर अत्यल्प करण्यात आला असल्याने अल्पावधीतच स्लॉबची गळती होत आहे. अंदाजपत्रकात सिमेंटच्या विटा वापरणे गरजेचे असताना कंत्राटदाराने मातीच्या विटा वापरल्या आहेत. सदर बांधकामात कंत्राटदाराने अभियंत्याशी आर्थिक साटेलाटे करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. बांधकाम पूर्ण होवून सहा महिने लोटले तरी शाळेची रंगरंगोटी अर्धवट आहे. तर टाईल्स निकृष्ट दर्जाची आहे. टाईल्स फिटींग वरचढ झाली असून जिन्याची रिलींग कमजोर लावल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. ही इमारत पूर्ण होऊन सहा महिने झाले असले तरी अजूनही जिल्हा परिषदेने शाळा प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित केली नाही. त्यामुळे इमारत पूर्ण होऊनही विद्यार्थ्यांना एक किलोमीटर अंतर पार करुन येसगाव येथील शाळेत जावे लागत आहे. पहिली ते तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वयाने लहान असून रहदारीच्या रस्त्याने ये-जा करावी लागत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. सदर शाळेची चौकशी करुन कंत्राटदारावर कारवाई करावी व इमारत हस्तांतरित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
भेजगाव शाळा इमारतीचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 1:40 AM