भदन्त सुरई ससाई : दीक्षाभूमीवर धम्मप्रवचन कार्यक्रमचंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था दूर करण्यासाठी प्राणपणाने संघर्ष केला. समाजाला शिका, संघटीत व्हा व समानतेसाठी संघर्ष करण्याचा संदेश दिला. पंचशील व त्रिशरण ग्रहण करून धम्म दीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नातील धम्मचक्र जगावर फिरले नाही. परिणामी धम्म चळवळ काहिशी मंदावल्याचे दिसत आहे. आता मात्र भंतेनी जनतेला विश्वासात घेवून जयभीमचा नारा बुलंद करुन धम्मचक्र गतीमान करण्यासाठी कार्य करण्याचा सल्ला अखिल भारतीय धम्म सेना नायक आर्य नागार्जून सरई ससाई यांनी येथील धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभात रविवारी आंबेडकरी जनसमूहाला दिला.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ पार पडला. यावेळी धम्मप्रवचन कार्यक्रम दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, प्रा. डॉ. नंदवर्धन बोधी महाथेरो, भंते डॉ. वण्णासामी महाथेरो, भंते डॉ. मेतानंद महाथेरो, भंते ज्ञानज्योती, भंते धम्मसारथी, भंते बोधीरत्न, भंते नागोघोष, भंते नागाप्रकाश, भंते नागवंश यांची उपस्थिती होती.आर्य नागार्जून सुरई ससाई पुढे म्हणाले, धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे. बुद्ध काळात धम्माची व्याप्ती वेगळी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी विचारसरणी नष्ट करण्यासाठी जीवनभर संघर्ष केला. सामाजिक दु:ख निवारण्यासाठी प्रयत्न केला. समाजात वेगवेगळ्या विचारधारा असल्या तरी सामाजिक प्राप्त करण्यासाठी सर्वांनी संघटीत प्रयत्न करण्याची गरज आहे.जगातील श्रीलंका, जपान, चीन, थायलंड या राष्ट्रासह अन्य राष्ट्रात धम्मचळवळ पोहचविणे आवश्यक आहे. राष्ट्राराष्ट्रात यामुळे मैत्री भावना तयार होण्यास मदत मिळणार आहे. यातूनच सामाजिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपणे सोपे जाणार आहे, असेही त्यांनी विचार मांडले. संचालन प्रा. सतीश पेटकर व प्रा. दिलीप रामटेके यांनी तर आभार प्रा. विश्रांती धनांजे यांनी मानले. विपश्चनामुळे धम्माची चळवळ मंदावलीधम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या धम्मप्रवचन समारंभात भंते ज्ञानज्योती यांनी प्रवचन करताना विपश्चना साधनेवर भर दिला. विपश्चना आत्मचिंतन करण्याचे साधन म्हणून त्यांनी उल्लेख केला. यावर प्रहार करताना आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी सांगितले की, भंते चंद्रमणी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धम्म दीक्षा देताना त्रिशरण आणि पंचशिल मानवी जीवन जगण्याचे सार असल्याचे नमूद केले होते. काही भंतेनी विपश्चना साधनेचा विपर्यास करुन धम्म चळवळ गतीमान करण्याऐवजी मंदावण्यासाठी मदत करीत असल्याचे भाषणातून सांगितले. भंतेनी पैसा गोळा करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
धम्मचक्र गतिमान करण्यासाठी कार्य करा
By admin | Published: October 17, 2016 12:45 AM