वेकोलिचे दुर्लक्ष : गैरप्रकाराला आळा घाला घुग्घुस : वेकोलिच्या वणी क्षेत्राच्या मुख्य महाव्यवस्थापक कार्यालय उर्जाग्राम मुख्यालयातून सिव्हिल एस.ओ. द्वारा कामाचे टेंडर होण्यापूर्वीच आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट देण्यात येत असून प्रत्यक्षात कामेही सुरू करण्यात येत आहे. हा गेैरप्रकार मागील काही वर्षांपासून सुरू आहे. वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत ठेकेदार व सिव्हिल विभागाचा मनमानी कारभार यामुळे उघडकीस आला आहे. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्य महाव्यवस्थापकांनी संबधित ठेकेदार व अधिकारी यांचा चांगलाच क्लास घेतला असला तरी त्यांच्याच कार्यालयातून सिव्हिल अभियंता एस. ओ. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करीत आहे . जुलैच्या २६ तारखेला उर्जाग्राम येथील मनोरंजन केंद्राचे व बी-१ गेस्ट हाऊसच्या नुतनीकरणाच्या कामाचे टेंडर होणार होते. मात्र एस.ओ ( स्टाफ आफिसर ) प्रसाद यांनी आपल्या मर्जीतील दोन ठेकेदाराला काम दिले. एवढेच नव्हे तर शनिवारपासून कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. त्यामुळे २६ जुलैच्या टेंडरचे काय काम, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात वणी क्षेत्राचे एस.ओ ( स्टाफ आफिसर ) प्रसाद यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी दोन लाखांपर्यतची कामे देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. हा अधिकार स्टॉफ आॅफीसरला आहे तर टेंडरचा खटाटोप कशाला, असा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकाराची आणि मागील एका वर्षात झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेकोलित दर वर्षी मोठ्या थाटामाटात सतर्कता जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करून मोठया प्रमाणावर खर्च केला जातो. यावेळी भ्रष्टाचार निर्मुलनावर चर्चा केली जाते. तरीही असे प्रकार घडत आहेत.
निविदाविनाच वेकोलित सुरू आहेत कामे
By admin | Published: July 25, 2016 1:22 AM