आवाळपूर : मागील वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगभर असल्यामुळे विविध उद्योगधंद्यांची आर्थिक स्थिती खालावल्याचे चित्र सगळीकडे दिसून येत आहे. यातच प्रतिबंध कालावधी शिथिल झाल्यामुळे विविध उद्योगधंदे पुनश्च सुरू झाले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुनील ढवस यांच्या नेतृत्वात विजय क्रांती कामगार संघटनेने विविध आंदोलन केली. मात्र याकडे कंपनीने लक्ष दिले नाही. त्यामुळे विजय क्रांती कामगार संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी सकाळपासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी काम बंद करून बैठा सत्याग्रह सुरू केला.
शेवटी कंपनी प्रशासनाने पोलीस प्रशासनाला तत्काळ पाचारण करून मध्यस्थी करण्याकरिता आग्रह केला. गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, रायपुरे, चौकी अमलदार नागोबा बुरान, तिरुपती माने, सुनील मेश्राम व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून ज्या कामगारांना केवळ पाच ते सहा दिवस रोजगार मिळाला, अशा सर्वांना पंधरा दिवसाचा रोजगार मिळावा, यासाठी कंपनी व्यवस्थापनाला बाध्य केले. यातच दुसरा मुद्दा असा की सदर उद्योगधंद्यासाठी जास्तीत जास्त कामगार हा मराठी व परिसरातील असल्यामुळे शिवाय प्रत्येकाकडे काही ना काही प्रमाणात शेती व्यवसाय असल्यामुळे हंगामात एक दोन दिवस रजा घेतलेल्या कामगाराला कोरोना तपासणीची सक्ती केली जाते व अभिप्राय येईपर्यंत त्याला कामावर रुजू केल्या जात नाही. यामुळे सुद्धा अनेक कामगारांचे रोजगार बुडत आहे. ही समस्या सोडविण्याची मागणीही कामगारांनी केली. सकाळी ७ वाजतापासून दुपारी १२ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहिले. यात कंपनीने मोठे नुकसान झाले. कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार २७ तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विजय क्रांती कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील ढवस यांनी दिला आहे.