गावकऱ्यांची मागणी : कंत्राटदारावर गुन्हा दाखल करासास्ती : भुगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी व गावातील पाणी समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार सुभाष धोटे यांनी गाव तलावाचे काम दिले. परंतु संबंधित कंत्राटदाराने लोकप्रतिनिधीचा हा दूरदृष्टीकोन पाण्यात बुडविला. जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत कोरपना- राजुरा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे २० लाख ३९ हजार ६२ रुपये किंमतीचे गाव तलावाचे कंत्राट चंद्रपूर येथील सागर या कंत्राटदाराला दिले. नियमाप्रमाणे नोव्हेंबर २०१३ मध्ये या कामाचे भूमिपूजन करुन कामाला सुरुवात केली. परंतु आज अडीच ते तीन वर्ष होत असूनसुद्धा तलावाचे काम पूर्ण न झाल्याने गावातील नागरिकांमध्ये संबंधित कंत्राटदारविरोधात तिव्र रोष दिसून येत आहे. हे काम सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे गावकऱ्यांनी केल्या. परंतु प्रशासनाने कत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे प्रशासनाचीही याला मुक सहमती तर नाही ना असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.पहिल्याच पावसाळ्यात तलावातील सर्व पाणी मातीच्या बांधलेल्या भिंतीमधून वाहून गेले. ओव्हर फ्लो पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या भिंतीखालूनच पाणी वाहून जात असल्यामुळे कामाचा दर्जा सर्वासमोर आला. त्यानंतर राजुरा येथील जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभागाच्या उपअभियंत्यानी तलावाला भेट दिली असता कंत्राटदाराला तलावाची दुरुस्ती करण्यास सांगितले. मात्र तलावाच्या बांधकामात काहीच दुरुस्ती झाली नाही. तलावाच्या बांधकामासाठी वापरलेली माती ही निकृष्ट दर्जाची असून त्या मातीमधून तलावातील पाणी पाझरत असल्याने व अनेक ठिकाणी लिकेज असल्याने तलावातील पाणी निघून जाते. लाखो रुपये खर्च करुनसुद्धा तलावात डिसेंबर- जानेवारी महिन्यात थेंबभर पाणीसुद्धा राहत नाही, हे विशेष. तीन वर्ष लोटत असतानासुद्धा तलावाचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रशासनाची कामाची गती कशी आहे, हे दिसून येते. संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
गाव तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: July 07, 2016 1:00 AM