काँग्रेसचे निवेदन : बांधकामगारांच्या समस्यांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्षचंद्रपूर : जिल्ह्यातील विविध उद्योगात काम करणारे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळत नसल्यामुळे या संबधी लक्ष वेण्याकरीता या संबंधीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाची स्थिती अत्यंत दयनिय अवस्थेत आहे. येथे कोणताही सक्षम अधिकारी नसल्याने संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना अनेक समस्येला सामोर जावे लागत आहे.महाराष्ट्र राज्याने असंघटित कामगाराकरीता महा. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ २०११ मध्ये सुरू केलेले आहे. परंतु या अंतर्गत येणारे लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु या विभागात सक्षम अधिकारी नसल्याने जिल्ह्यातील अनेक कामगार या कार्यालयात दूरवरून येऊन दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. सध्या शासनातर्फे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, सुरक्षारक्षक मंडळ, घरेलु कामगार मंडळ व बाल कामगार मंडळ, माथाडी कामगार मंडळ आदींमध्ये नोंदविलेल्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगामधील कामगाराच्या प्रश्नासंबंधी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. अनेक दिवसापासुन या विभागात सहा. कामगार आयुक्त व सरकारी कामगार अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदे नियमित भरण्यात यावी. अनेक उद्योगामध्ये कामगारांना सुरक्षा सामुग्री पुरविण्यात येत नाही.या दृष्टिकोनातून कामगार विभागाच्या माध्यमातून नियमित निरीक्षण करणे गरजेचे असतानासुद्धा त्याकडे कामगार विभागाच्या कार्यालयात नियमित अधिकारी नसल्याने दुर्लक्ष होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा जिल्हा औद्योगिक असल्याने या ठिकाणी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.या मंडळांमध्ये नोंदणीकृत असंघटित कामगारांना कल्याणकारी योजनेमध्ये लाभ मिळत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे. अनेक मंडळात भरपूर निधी असतानासुद्धा कामगारांना यापासुन वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सक्षम नियमित अधिकारी देऊन कामगारांना न्याय देण्यात यावा, अशी मागणीही देवतळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित
By admin | Published: April 07, 2017 12:56 AM