राजुरा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. सद्यास्थितीत मोठ्या प्रमाणात कापूस फुटला आहे. मात्र बोंडअळीमुळे वेचनीला त्रास होत आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. दरम्यान, मजुरांची मनधरणी करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिध्द आहे. तालुक्यातील सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, वरोडा, चिंचोली, गोयेगाव, पांढरपौनी, आर्वी, चार्ली, निर्ली, पेल्लोरा, कढोली, बाबापूर, मानोली आदी परिसरात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मात्र यावर्षी शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
सद्यास्थितीत संपूर्ण शेतात कापसू फुटला आहे. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. परंतु, परिसरात मजुरांची कमतरता असल्याने वेचणीकरिता मजूर मिळेनासे झाले आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.