मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवाकडून होत आहे.
दूरसंचार सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी
नागभीड : येथील दूरसंचार विभागाची सेवा अनियमित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेरी येथे एक राष्ट्रीयीकृत बँक, सीडीसीसी बँक शाखा आहेत. त्यांना नेटवर्कअभावी फटका बसत आहे.
बंदवस्थेतील सौर दिवे दुरुस्त करावे
चंद्रपूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरु केले. मात्र यातील अर्धेअधिक सौरदिवे बंद अवस्थेत आहेत. काही सौर दिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट
चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
वरोरा : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व विटाभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.
जीवनापूर येथे माकडांचा धुमाकूळ
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील माकडांनी धुमाकूळ सुरू केल्याने घरावरील कौलांची व त्यामुळे वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांची केली आहे.
शासकीय कार्यालये कोरपना येथे आणावी
कोरपना : तालुका वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शाखा अभियंता पकडीगुडम सिंचन प्रकल्प, हिवताप निर्मूलन आरोग्य उपपथक कार्यालये गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा फाटा येथे आहे. सदर कार्यालय एकाच ठिकाणी कामे होण्यासाठी कोरपना मुख्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कोरपना येथे स्थानांतर करण्याची मागणी केली जात आहे.
दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी उद्योग आहेत. मात्र उद्योग परिसरातील गावांचा आजही विकास झाला नाही. त्यामुळे उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. तर मूल, सावली, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यात उद्योग नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनाचलकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त
चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकामुळे या योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावलीत नियमित पाणीपुरवठा करावा
सावली : येथील प्रादेशिक योजनेद्वारे करण्यात येणार पाणीपुरवठा अनियमीत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मोर्चा काढूनही ही समस्या सुटली नाही.
जडवाहतुकीमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : क्षमता कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था होत आहे. परिणामी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अनावश्यक सेवांनी मोबाईधारक त्रस्त
खांबाडा : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्याकडून अनावश्यक सेवांचा भडिमार ग्राहकांवर होत आहे. यामुळे मोबाईल धारक त्रस्त झाले आहेत. तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे.
धूळ प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
माजरी : कोळसा उद्योगांमुळे माजरी शहर सर्वदूर परिचित आहे. मात्र या कोळसा खाणीच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे शहरात धूळ प्रदूषण वाढले आहे. बऱ्याच वाहनावर ताडपत्री झाकून राहत नसल्याने कोळसा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
देऊरवाडा येथील तीर्थक्षेत्राचा विकास करावा
भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाण आहे. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.
चिमूर - नंदोरी मार्गावर बसफेऱ्या वाढवा
खडसंगी : चिमूर येथून कोरा मार्गे नंदोरीसाठी बसफेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या मार्गावर अत्यल्प बसेस असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावे लागते. याचा फटका सर्वसामान्य येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसतो आहे.
गोंडपिपरी - गडचांदूर बससेवा सुरू करा
गोंडपिंपरी : येथून तोहोगाव मार्गे गडचांदूरसाठी थेट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बस सेवेमुळे कमी अंतरात व आर्थिक बचतीत प्रवाशांना प्रवास करता येईल. याचा लाभ गोंडपिपारी व राजुरा तालुक्यातील नागरिकांना होईल.
जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा
सिंदेवाही : पहाटेला सुमारास फिरायला गेलेले अनेकजण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असल्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जंगलाव्याप परिसरात अंधाराच्या वेळेस फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागातर्फे केले आहे.
जागेचे पट्टे देण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील बहुतांश भाग हा नजूलच्या जागेवर वसला आहे. जवळपास ६० हजार घरे नजुलच्या जागेवर आहेत. लाखो रुपयांचे घर असूनही पट्टे नसल्यामुळे येथील नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. घरकुल योजनेअंतर्गत अनेकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. मात्र घराला पट्टा नसल्याने घराचे स्वप्न लांबले आहे.
मोकाट कुत्र्यांची चिमुरात दहशत
चिमूर : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून शहरातील विविध वॉर्डांत मागील काही दिवसांपासून हैदोस सुरू आहे़ रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडल्यास कुत्र्यांपासून सावध राहण्याची वेळ आली़. बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
धूर फवारणी करण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. महापालिका प्रशासनाने मच्छरांचा बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, काही मोकळ्या भुखंडावर आजही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे याचाही धोका नागरिकांनी आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.