मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवाकडून होत आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
चिमूर : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व विटाभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.
नव्या कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी
कोरपना : तालुक्यातील कवठाळा व पार्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांना गडचांदूर किंवा कोरपना येथे जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनाचलकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
स्वच्छता करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकामुळे या योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.