बल्लारपूर : बल्लारपूर शहराला लागून वर्धा नदी वाहते. यावर्षी पर्जन्यमान सरासरीच्या तुनलेत अधिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी शहराला पूरस्थितीचा सामना करावा लागणार आहे. यासाठी पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सामाजिक संस्थाची मदत घेतली जाणार आहे. शुक्रवारी नगरपालिकेच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला नगराध्यक्ष छाया मडावी, मुख्याधिकारी विपीन मुदधा यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. शहरातील किल्ला वॉर्ड, सिद्धार्थ नगर, गणपती वॉर्ड, सुभाष वॉर्डातील जोकूनाला परिसर पुराने बाधित होतो. यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागते. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते. वर्धा नदीचे पात्र शहराला लागून असल्याने पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती दरम्यान जीवहाणी टाळण्यासाठी नगर प्रशासनाने उपाययोजना करण्याचे नियोजन केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे, असे यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी विपीन मुदधा यांनी सांगितले.पावसाळा सुरू होण्यापूर्वी गणपती वॉर्डातील नाले सफाई, रेल्वे नगरातील भेंंडे परिसरातील नाला, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड, सरदार पटेल, वॉर्डातील घुग्घुस फाईल परिसर, गोकूलनगर वॉर्ड, बालाजी वॉर्ड, शिवनगर वॉर्ड आदी भागातील मोठ्या नाल्याची सफाई जेसीबी मशीन माध्यमातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पावसाच्या दिवसात नाल्याचे दूषित पााणी नागरिकांच्या घरात जाऊ नये व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी आताच उपाययोजना करण्याचे निर्देश बैठकी दरम्यान नगरसेवकांनी दिले. दरम्यान नगरपालिकेचा आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग यांनी संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश मुख्याधिकारी विपीन मुदधा यांनी संबंधितांना दिले.यावेळी नगराध्यक्ष छाया मडावी, उपाध्यक्ष संपत कोरडे, स्वच्छता समितीचे सभापती विनोद यादव, मुख्याधिकारी विपीन मुदधा, नगरसेवक देवेंद्र आर्य, विनोद आत्राम, शांताबाई बहुरिया, कार्यालय निरीक्षक विजय जांभुळकर, कर निरीक्षक विलास बेले, कर्मविर सौदागर, सुरेश बदलवार, संकेत नंदवंशी, जितेंद्र चवरे, किशोर संगडीवार, प्रशांत चिचघरे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा
By admin | Published: June 09, 2016 1:26 AM