वरोरा : नगर पालिका वरोराच्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून वेतन थकीत आहे. दिवाळी सणही आला असताना अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे न.प. कार्यालयाच्या परिसरात कर्मचाऱ्यांनी आपला संताप व्यक्त केल्याने प्रशासनाने वेतनासाठी धावपळ सुरू केल्याचे दिसून आले. वरोरा नगर परिषदेमध्ये २५० कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ ते १० तारखेच्या आत करण्यात येते. या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यापासून वेतन अदा करण्यात आले नाही. तिसऱ्या महिन्याची आज २१ तारीख असतानाही व दिवाळीच्या पहिल्या दिवशीही वेतन प्रशासनाने केले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दिवाळीपूर्वी अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले जाते. यामुळे कर्मचारी आपली दिवाळी साजरी करतात. दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनाही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. वेतनातून कपात होणाऱ्या एलआयसी, गृह कर्ज व इतर कर्जाचे हप्तेही थकीत असल्याने त्यावरील दंडाचा भुर्दंडही प्रशासनाच्या चुकीने कर्मचाऱ्यांना अदा करावा लागत आहे.दिवाळीचा पहिला दिवस २२ पासून कार्यालयाला सुट्टी त्यानंतर बँकांनाही सुट्टी असते. यामुळे वेतनाअभावी दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्नही तुर्तात न.प. कर्मचाऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे. थकीत वेतनाच्या मागणीसाठी कर्मचारी न.प. कार्यालयाच्या परिसरात संताप व्यक्त करीत होते. त्यानंतर प्रशासनाने धावपळ सुरू केली परंतु यावर तोडगा निघाला नव्हता. याबाबत न.प. मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांच्याशी संपर्क साधला असता डीडीवर कोड नव्हता. आजच जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून चेक घेऊन न.प. कर्मचारी निघाल्याची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी)
वरोरा नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत
By admin | Published: October 22, 2014 11:15 PM