चंद्रपूर : सरत्या वर्षात महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळांतर्गत नोव्हेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या वर्षभराच्या कालावधीत १ कोटी ८२ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आली आहे. यामध्ये ५४२ वीजचोर हे आकडेबहाद्दर तर ५२९ वीजग्राहकांनी विजेच्या मीटर्समध्ये छेडछाड करून विजेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या सर्व वीजचोरांनी १४ लाख १४ हजार १६८ विजेच्या युनिटसचा बेकायदा वापर केला आहे.
वीजचोरीसाठी कायपण...
वरोरा विभागात ३२ आकडा टाकून वीज चोरी झाली तर ५२ वीज मीटरमध्ये छेडछाड करण्यात आली. बल्लारपूर विभागात ३२ आकडा टाकून वीजचाेरीे, ८६ वीज मीटरमध्ये छेडछाड, ब्रम्हपुरी विभागात ७७ आकडे बहाद्दर व ६७ वीज मीटरमध्ये छेडछाड झाली. चंद्रपूर विभागात १६८ वीज मीटरर्समध्ये छेडछाड करणारे असे एकंदरीत १ हजार ७१ वीजचोर या कारवाईत सापडले.
वीजचोरी कराल, तर जेलची हवा खाल
वीजचोरांविरूद्ध वीजकायदा २००३ च्या कलम १३५ व १३८ अंतर्गत कारवाई करण्यात आली. वीज चोरीची व तडजोड रक्कम न भरणाऱ्या ११ वीज चोरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. ही कारवाई मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे व गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता रविंद्र गाडगे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर, आलापल्ली, गडचिरोली, ब्रम्हपुरी विभाग कार्यकारी अभियंता, उपविभागीय व शाखा अभियंता व सहकाऱ्यांनी केली.
विभागनिहाय वीजचाेरी प्रकरणे
वरोरा ८४
बल्लारपूर १२४
ब्रम्हपुरी १४४
चंद्रपूर विभागात १६८
वीजचोरी सामाजिक गुन्हा
वीजचोरी एक सामाजिक अपराध आहे. वीजचोरी करून कोळशासारख्या सीमित संसाधनापासून तयार होणारी वीज चोरून देशाच्या संपत्तीवर घाला घालणे चुकीचे आहे. त्यामुळे वीजचोरीपासून परावृत्त होण्याचे, कायदेशीर मार्गाने वीज वापरण्याचे तसेच विजबील वेळेवर भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले.