चंद्रपूर : वरोरा येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी झाली. यामध्ये तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने वरोऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बँक ऑफ इंडियाची ही शाखा वरोरा येथील वर्दळीच्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेत आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांचे खाते या बँकेत आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बँकेतील रोखपालाची नजर चुकवून अंदाजे दोन व्यक्तींनी ही रोकड लंपास केल्याचे रोखपालाच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती शाखा व्यवस्थापकाला दिली. घटनेची तोंडी माहिती शाखाधिकारी श्याम अत्तरगडे यांच्याकडून मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरूच होती. यामध्ये १६ लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सुत्रांनी व्यक्त केला आहे. हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, वृत्त लिहीपर्यंत बँकेकडून रितसर तक्रार करण्यात आली नव्हती.
घटनेची पुनरावृत्ती
वरोरा शहरात भरदिवसा घरफोड्या झाल्या आहेत. दुचाकी इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दरोडा पडला होता. आता दुसरी घटना वरोऱ्यात घडली. सुमारे १० वर्षांपूर्वी बँक ऑफ इंडियाच्या याच शाखेत बँक बंद करताना एक मद्यपी बँकेत शिरला आणि झोपी गेला होता. सकाळी चौकीदार आला तेव्हा तो बाहेर आला. मात्र, तो मद्यधुंद अवस्थेत असल्यामुळे चोरीला काहीही गेले नव्हते. आता तर भरदिवसा चोरीची घटना उजेडात आली.
घटनेची माहिती बँकेकडून मिळाली असता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे नेमकी किती रोकड लंपास झाली, याचा आकडा कळू शकला नाही.
- नीलेश चवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वरोरा.