चंद्रपूर : बल्लारशा वनपरिक्षेत्रअंतर्गत असलेल्या वन उपजत तपासणी नाका बामणी येथे अवैध वन उपजप्रकरणी ट्रक व ५ लाखांचे सागवान लाकू जप्त करण्यात आला आहे.
हा ट्रक बालाघाट (म.प्र.) येथील लाकूड व्यापारी पियुष पटेल आर. एस. टिंबर्स यांच्यामार्फत सागवान भरून हैदराबाद येथील कांता टिंबर्सकडे पोहोचता करावयाचा होता. दरम्यान, २६ नोव्हेंबरला बामणी येथील नाक्यावर तपासणी केली असता, सागवान लाकडावर हॅमरचे निशाण अंकित नव्हते. चौकशीदरम्यान ही अवैध वाहतूक असल्याचे आढळून आले.
यात ५ लाख ४ हजार रुपयांचे सागवान लाकूड व २० लाख रुपयांचा ट्रक असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहन चालक शेख मसूदविरुद्ध वन कायद्यान्वये भारतीय वन अधिनियम कलम १९२७ चे कलम ४१, ४२, ५२(१), ५२ १( अ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ चे नियम क्रमांक ४(६) , ४१, ४२ अन्वये प्राथमिक व गुन्हा क्र. ०८९६८/२२४१७६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या नेतृत्वाखाली तपासणी दल तयार करण्यात आले असून त्यांनी १ डिसेंबरला बालाघाट येथे जाऊन आर. एस. टिंबर्सच्या कागदपत्रांची तपासणी केली व त्याचा अहवाल विभागीय वनाधिकारी बालाघाट यांना सादर करण्यात आला. यात जिवंत साग वृक्षांची तोड करून साग चिराण तयार करण्यात आले, असे तपासाअंती निदर्शनास आले. त्यात आर. एस. टिंबर्स यांच्यावर मध्य प्रदेश काष्ठ अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक अरविंद मुंढे व सहायक वनरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करीत आहेत.