लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : नागपूर येथे झालेल्या महिला कुस्तीगीर खासदार चषक स्पर्धेतून कास्यपदक जिंकून आलेल्या चंद्रपूर येथील मोना विजय मुके हिचा बल्लारपूर पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर आणि मीनाक्षी शिरस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोनाच्या मातोश्री वंदना मुके उपस्थित होत्या. मोना ही येथील पोलीस स्टेशनमधील सहायक फौजदार विजय मुके यांची कन्या आहे.मोना ही चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्षात शिकत आहे. नागपूरला नुकत्याच झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत ६३ किलोहून अधिक वजन गटात तिने कसब पणाला लावून कास्यपदक जिंकले. आमीर खानचा कुस्तीवरील ‘दंगल’ हा चित्रपट बघितल्यानंतर तिला कुस्तीत आवड निर्माण झाली. तेव्हा ती चंद्रपूरच्या मातोश्री विद्यालयात शिकत होती. कुस्तीमध्ये तिची आवड बघून तेथील क्रीडा शिक्षक काळे यांनी तिला प्रोत्साहित केले. लहान मोठ्या स्पर्धेत भाग घेवून ती जिंकत गेली. महाविद्यालयात आल्यानंतर तिला धर्मशिल कातकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. गतवर्षी ती सेहतक (हरियाणा) येथे आयोजित राष्ट्रीय कुस्तीगीर स्पर्धेतही सहभागी झाली होती. या स्पर्धेतून तिला बरेच काही शिकायला मिळाले व तेव्हापासून आत्मविश्वास वाढला, असे तिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कुस्तिगीर फोकट ही तिची आदर्श आहे. येथे झालेल्या कार्यक्रमाला डॉ. रजनी हजारे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिक दुधलकर, प्राचार्य प्रकृती पाटील, मधू कपूर, नगरसेविका मीना बहुरिया, सविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते. संचालन सहायक पोलीस निरीक्षक गोखरे यांनी केले.
कुस्तीगीर मोना मुकेचा बल्लारपुरात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:57 PM
नागपूर येथे झालेल्या महिला कुस्तीगीर खासदार चषक स्पर्धेतून कास्यपदक जिंकून आलेल्या चंद्रपूर येथील मोना विजय मुके हिचा बल्लारपूर पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर आणि मीनाक्षी शिरस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ठळक मुद्देदंगल चित्रपटातून प्रेरणा : नागपूरच्या स्पर्धेत यश