चंद्रपूर :साहित्यात प्रचंड शक्ती असते. समाजाला विधायक वळण देण्याचे कार्य सकस लेखन करू शकते. त्यामुळे लेखक व कलावंतांनी सभोवतीचे समकालीन ज्वलंत वास्तव मांडावे, अशी अपेक्षा अभ्यासकांनी स्व. कवी सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात बुधवारी (दि.१६) बल्लारपूर येथील कला वाणिज्य महिला महाविद्यालय सभागृहात व्यक्त केली.
झाडीबोली साहित्य मंडळांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समीक्षक डॉ. धनराज खानोरकर तर उद्घाटक जि. प. माजी सदस्य वैशाली बुद्दलवार यांनी केले. प्रमुख पाहुणे भाष्यकार सुनील पोटे, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, ॲड. हरीश गेडाम, डॉ. श्रावण बाणासुरे, ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, शालिनी सुनील कोवे उपस्थितीत होते.
व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव, माहिती, ज्ञान यासारख्या गोष्टी मनात साठवून ठेवण्याची आणि भविष्यात त्याचा उपयोग व्हावा म्हणून शब्दबद्ध करून त्या स्मृती तेवत ठेवणारा हा कवितासंग्रह स्मृतींचे निरंजन आहे, असे प्रतिपादन डॉ. धनराज खानोरकर यांनी केले. झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी सुनील कोवे यांच्या लेखनाचा आढावा घेतला. शालिनी सुनील कोवे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन प्रा. रामकृष्ण चनकापुरे यांनी केले. प्रशांत भंडारे यांनी आभार मानले.