चंद्रपूर (शांताराम पोटदुखे साहित्य परिसर) : केवळ प्रश्नार्थक साहित्य हे अपूर्ण साहित्य आहे. सरधोपट पोथीनिष्ठ सकारात्मक साहित्य हेही अपूर्ण आहे. त्यामुळे साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही दिली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि. स. जोग यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ व सूर्यांश साहित्य-सांस्कृतिक मंचद्वारा आयोजित चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहातील ६८ व्या तीन दिवसीय विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून शुक्रवारी ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष तथा गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख पाहुणे आमदार अभिजित वंजारी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, ॲड. फिरदोस मिर्झा, वि. सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्र. कुलगुरू डॉ. श्रीराम काळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, माजी आमदार सुदर्शन निमकर, संरक्षक प्रशांत पोटदुखे व मान्यवर उपस्थित होते.
६८ वे विदर्भ साहित्य संमेलन : 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम'वर राजकारणी बोलले; साहित्यिक मात्र गप्प
संमेलनाध्यक्ष डॉ. जोग म्हणाले, राजकीय व्यक्तींवर अकारण टीका करणारा साहित्यिक मी नाही. वयाच्या १२ व्या वर्षांपासून राजकीय आंदोलन व साहित्य लेखन या दोन्ही गोष्टी करीत आलो. लेखकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरे दिली पाहिजे. ही उत्तरे गांधीवाद, आंबेडकरवाद, राष्ट्रवादाच्या कुठल्याही वादाच्या आधारे असू शकतात, असेही संमेलनाध्यक्ष डॉ. जोग म्हणाले. प्रास्ताविक संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर तर संचालन डॉ. रमा गोळवलकर यांनी केले.
मने जोडते तेच खरे साहित्य - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूरला संमेलन होणे आनंदाची घटना आहे. दु:खमुक्तीचा मार्ग दाखविते, मने व समाज जोडते हेच खरे साहित्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्घाटनीय भाषणात केले. अलिकडे पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या घटू लागल्याने त्यांनी चिंता व्यक्त केली. मानसिक प्रदूषण दूर करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे ठरते. दर्जेदार साहित्य नव्या पिढीपर्यंत कसे पोहोचेल हा चिंतनाचा विषय असून बदलत्या काळानुसार नव्या पद्धतीने पुस्तके आली पाहिजे. यापूर्वी राज्याचे सांस्कृतिक खाते अत्यंत लहान वाटते. परंतु हे खाते परीस आहे. त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते, असेही मुनगंटीवार म्हणाले.