येथील ने. ही. महाविद्यालयाच्या बाजूला मुख्य रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नव्याने एकूण १७ गाळ्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सध्या हे बांधकाम सज्जापर्यंत पोहोचले आहे. ३० ऑगस्टला एका मजुराचा वरून जाणाऱ्या ११ के. व्ही. विद्युत तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. या प्रकरणाचा थातूरमातूर पंचनामा पोलिसांनी केला. घटनास्थळावर गांभीर्याने पाहणी न करता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही.
नगरपरिषद प्रशासनाकडून हे बांधकाम व गोदामाचे बांधकाम परवानगी न घेताच सुरू करण्यात आली आहेत. इतरत्र न. प. हद्दीत विनापरवानगी बांधकामे असतील, तर मुख्याधिकारी तथा अभियंता यांना अवैध बांधकाम थांबविण्याचे अधिकार आहेत तर शासकीय बांधकाम असताना व याआधी घेतलेल्या बांधकाम परवानगीचे नूतनीकरण करण्यात आले नाही. मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानासमोर सुरू असलेल्या बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे तसेच कृ. ऊ. बाजार समितीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी फिर्यादी दीपक शुक्ला यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत केली आहे.