आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : येथील काजल रावजी हनुमते हिच्या गूढ मृत्यूमागचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. तिचे नातेवाईक म्हणतात, ही हत्या आहे आणि पोलीस म्हणतात, तिने आत्महत्याच केली आहे. हत्या नसेल आणि काजलने आत्महत्या केली असेल तर ती का केली, याचा तपास पोलीस का करीत नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.काजलचा मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एखादी घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तपासाला चालना देण्याचे काम होणे अपेक्षित होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काजलची आत्महत्या आहे, असे सांगून तपास तिथेच थांबल्याचे दिसून आले. यामागील कारणांचा शोध वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे. काजल रविवारी पहाटे घरून बेपत्ता झाली. घरच्या मंडळींनी दुपारपर्यंत तिची संबंधित नातेवाईक व ओळखींच्या लोकांसह तिच्या मित्रमैत्रिणींकडे चौकशी केली. मात्र ती गवसली नाही. यानंतर त्याचदिवशी दुपारी तिच्या पालकांनी काजल बेपत्ता झाल्याची तक्रार सिंदेवाही पोलीस ठाण्यात केली, असे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर काजलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणते प्रयत्न केले, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कदाचित काजलचा शोध लागला असता आणि तिने आत्महत्या केली असेल, तर ती टाळता आली असती. बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी तिचा मृतदेहच विहिरीत तरंगताना आढळला. तो मृतदेह २४ तासातील आहे, हे पोलीसच सांगत होते. मग ती बेपत्ता झाल्यापासून कुठे होती, याचा तपास लागायला हवा होता. या प्रश्नांची उकल पोलिसांना तपासाच्या माध्यमातून करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांनी नोंदविले बयानसदर प्रकरण ‘लोकमत’ने उचलून धरताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी सिंदेवाही पोलिसांनी मृत काजलच्या आई-वडिलांचे बयान नोंदवून घेतले. आता तपासालाही नवी दिशा येण्याची शक्यता बळावली आहे.
पोलिसांच्या लेखी काजलची आत्महत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:24 AM
येथील काजल रावजी हनुमते हिच्या गूढ मृत्यूमागचे रहस्य अद्यापही उलगडले नाही. तिचे नातेवाईक म्हणतात, ही हत्या आहे आणि पोलीस म्हणतात, तिने आत्महत्याच केली आहे.
ठळक मुद्देपीएम रिपोर्ट : आत्महत्येमागील कारणांकडे दुर्लक्ष