घनश्याम नवघडे
नागभीड : गेल्या ८५ ते ९० वर्षांपासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागभीड येथे निघणाऱ्या मारबत मिरवणुकीची परंपरा कोरोनामुळे दुसऱ्या वर्षीही खंडित राहणार आहे.
नागभीड येथे अनेक प्रथा परंपरा आहेत. त्यापैकीच एक ही मारबतीची परंपरा. नागभीडचे बिसन आडकिने यांचा परिवार मारबतीची ही परंपरा ८५ ते ९० वर्षांपासून चालवित आहे. बिसन आडकिने यांच्या वडिलांनी गावात या मारबत मिरवणुकीची परंपरा सुरू केली. तेव्हापासून नागभीड येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत काढण्यात येते. बिसन आडकिने यांचे वडील हे मारबतीची प्रतिमा घरीच तयार करायचे व या मारबतीच्या प्रतिमेची मिरवणूक काढायचे. सद्यस्थितीत उद्भवलेल्या समस्यांचा धिक्कार करणाऱ्या घोषणा या मिरवणुकीत देण्यात येतात. या मारबत मिरवणुकीस नागभीडकरांकडून प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळत होता. वडिलांनी सुरू केलेली ही परंपरा बिसन आडकिने यांनीही सुरू ठेवली होती. आज बिसन आडकिने यांचे वय ६१ वर्षे आहे. पण त्यांचा उत्साह कायम आहे. मारबतीची प्रतिमा तयार करण्यासाठी बिसन आडकिने हे पोळा पाच सहा दिवसांवर आहे तेव्हापासूनच तयारी करायचे.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने त्यांच्या या उत्साहावर पाणी फेरले आहे. शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचा फटका येथील मारबत मिरवणुकीलाही बसला. या बंदीची कल्पना अगोदरच आल्याने आडकिने यांनी मारबतीची प्रतिमाही तयार केली नाही. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच वाजत गाजत आडकिने यांच्या घरून निघणाऱ्या मारबतीच्या मिरवणुकीत यावर्षी खंड पडण्याचे हे दुसरे वर्ष आहे.
बॉक्स
मिरवणूक नाही, मात्र विधी होते पूर्ण
मारबत मिरवणुकीत खंड पडला असला तरी मिरवणूकपूर्व आणि मिरवणुकीनंतरचे जे विधी असतात ते विधी आडकिने यांनी परंपरेनुसार पार पाडले आहेत. मारबतीची एक छोटीशी प्रतीकात्मक प्रतिमा तयार करून या प्रतिमेची घरी पूजाअर्चा करून ज्या ठिकाणी मारबतीच्या प्रतिमेचे दहन करण्यात येते त्याठिकाणी या प्रतीकात्मक प्रतिमेचे परंपरेनुसार दहन करण्यात येणार आहे.
050921\img-20210905-wa0059.jpg
मारबतीचा संग्रहीत फोटो