शेतकरी चिंतातुर : काही शेतकऱ्यांचा खर्चही निघाला नाहीतळोधी (बा.) : सुरुवातीपासून धानाचे पऱ्हे टाकण्यापासूनच अनेक संकटावर मात करुन मायेच्या ममतेने धानाचे पीक घेणाऱ्या धान उत्पादकाच्या नशिबी शेवटी कर्जच शिल्लक राहिले. त्यामुळे सदर कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत तळोधी (नागपूर) परिसरातील शेतकरी सापडला आहे.सुरुवातीला पावसाने मारलेली दडी व त्यामुळे पऱ्ह्यांची नासाडी, दुबार पऱ्हे टाकून, कसेबसे धानाची रोवणी केली. मायेच्या ममतेने रोवणी केलेल्या धान पिकाला निसर्गाची साथ नसतानाही महत्प्रयासाने पिकाची जपणूक केली व आता हातात धानाचे पिक येणार, या आनंदात शेतकरीी असताना हंगाम संपण्याच्या शेवटच्या पंधरा दिवसात वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम झाला. एकदम धान पीक कापणीला आले. त्यामुळे धान भरलेच नाही व शेवटी धानाची मळनी करताना धानाचे फोल हवेबरोबर उडून गेले. त्यामुळे धान उत्पादकाच्या उत्पादनात कमीतकमी ३० ते ४० टक्के घट झाली आहे. सुरुवातीला धानाची दुबार पेरणी, अपुऱ्या पावसामुळे पाणी देण्याचा वाढलेला खर्च व भोगावा लागलेला त्रास, उत्पादनात झालेली ३० ते ४० टक्के घट व शासनाकडून धान पिकाला मिळणारा अत्यल्प भाव, यामुळे तळोधी (बा.) परिसरातील शेतकरी सर्व बाजूने नागवला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान उत्पादनाच्या शेतीकरिता काढलेले कर्ज व त्यावरील व्याज कसे परत करावे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. (वार्ताहर)
तळोधी (बा.) परिसरातील धान उत्पादकांचे उत्पन्न घटले
By admin | Published: December 09, 2015 1:27 AM