गोपालकृष्ण मांडवकर - स्व. शरद जोशी साहित्य नगरी (चंद्रपूर) ग्रामीणांच्या मनोरंजनातून निर्माण झालेल्या झाडीपट्टी रंगभूमीने समृद्ध लोककला या संस्कृतीला दिली. त्यातून लोकनाट्याचे अनेक प्रकार रूढ झाले. मात्र बदलत्या आव्हानात्मक परिस्थितीत या समृद्ध लोककलेचा ऱ्हास दिसतो आहे. त्याला आपणच जबाबदार असल्याचा सूर विदर्भ साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘झाडीपट्टीतील लोककला, लोकनाट्य आणि रंगभूमी : वर्तमान वास्तव’ या परिसंवादातून वक्त्यांनी मांडला.सायंकाळी ६ वाजता पार पडलेल्या या साहित्य संमेलातील या तिसऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्याम मोहरकर होते. ज्येष्ठ झाडीपट्टी रंगकर्मी ग.रा. गडपल्लीवार, प्रा. धनराज खानोेरकर, डॉ. जयश्री कापसे, डॉ. राज मुसने यांनी या चर्चासत्रात भाग घेतला.डॉ. श्याम मोहरकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले, प्रथम लोककला जन्मली. त्यातून कलविष्कार जन्माला आला. लोकनाट्य त्यातूनच आले. लोकनाट्य बहुजनांच्या सादरिकरणातून आलेले असल्याचे सांगून ते म्हणाले, शाहिरी, राधा, बैठकीचे पवाडे, भींगी, रामायणी पवाडे, दंडीगान, रेला या हजारो वर्षांपासूनच्या कला आज मात्र लोप होण्याच्या मार्गावर आहेत.वर्तमान वास्तवाचा वेध घेताना डॉ. मोहरकर म्हणाले, संहिता जुन्याच राहील्या. त्यात काळानुरूप परिवर्तन झाले नाही. तत्कालिन सुशिक्षत वर्गाने याकडे दुर्लक्ष केले. मच्छिंद्र कांबळेंचे नाटक महाभारतामधील कथानकाच्या पात्रांचा आधार घेवून विदेशात दौरे करते, तसे आमच्या लोकांना का जमू नये ? चंगळवादी संस्कृतीने जगण्याचे अर्थ हिरावले. व्यावसायिकपणाने रंगभूमीवरचा आमचा कंट्रोल उडाला, हे देखील लक्षात घ्यायला हवे. डॉ. राज मुसने झाडीपट्टीचा इतिहास मांडताना म्हणाले, १९४५ मध्ये आरमोरीतील दत्त मंदीर नाट्य मंडळ स्थापन झाले. हे झाडीपट्टीतील नोंदणीकृत पहिले नाट्यमंडळ. कुरूडसारख्या १०० घरांच्या वस्तीच्या गावाने १६४ वर्षांची नाट्यपरंपरा जपली. बदलत्या काळात रंगमंचाचा वापर वाढला, नेपत्थ्यामध्ये बदल घडला. झाडीपट्टी रंगभूमीला समृद्ध आणि ऐतिहासिक परंपरा आहे. मात्र आंबटशौकिनांमुळे ही समृद्धी बदनाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तालिमीत असणारा दुबळेपणाही या बदनामीसाठी कारणीभूत ठरला. असे असले तरी सदानंद बोरकर, चुडाराम बल्लारपुरे यांच्यासरख्या कलावंतांनी झाडीपट्टी नाटकांना उंचीवर पोहचविले. झाडीपट्टी रंगभूमीचे वर्तमान वास्तव मांडताना प्रा. जयश्री कापसे यांनी विदारकतेला हात घातला. त्या म्हणाल्या, मुंबई पुण्याच्या कलावंतांनी झाडीपट्टी रंगभूमीचा पायरी म्हणन वापर केला. झाडीपट्टी रंगभूमीने आपली चौकट मोडून बाहेर यावे, असे आवाहन करून त्या म्हणाल्या, नाटक हे कान आणि डोळ्यांनी मिळून करावयाचा यज्ञ आहे, असे महाकवि कालीदास म्हणायचे. मात्र या यज्ञाचा दर्जा का खालावला याचा विचार येथे व्हावा. नाटकापूर्वी होणारी लावणीची मागणी, रेकॉर्डींग डान्स यावर त्यांनी टीका केली. चंद्रपूरच्या रंगभूमीचेही चांगले चित्र नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.वडपलल्ीवार गुरूजी यांनी आपल्या नाट्यक्षेत्रातील दीर्घ प्रवास थोडक्यात सांगून झाडीपट्टी नाट्यक्षेत्र कसे समृद्ध आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला. डॉ. जयश्री कापसे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना ते म्हणाले, कलेत अभिनयाला महत्व आहे. गजानन जहागिरदार यांनी केलेल्या ‘परकाया प्रवेश’ या शब्दप्रयोगाची मिमांसा करून ते म्हणाले, कला अभिनयाने समृद्ध होते. ती समृद्ध करण्याचे काम गेली शेकडो वर्षांपासून झाडीपट्टी रंगभूमीने केले आहे. गावातीलच कसलेल्या दिग्दर्शकांकडून समृद्ध झालेल्या नाटकांचे कौतूक गतजीवनात कसे झाले, हे देखील त्यांनी स्वानुभवानतून सांगितले.प्रा. धनराज खानोरकर यांनी सौंदर्यपूर्ण भाषेतून आपल्या विचारांची मांडणी केली. ते म्हणाले, नाटक हा श्वास आहे, तर लावणी हा झाडीपट्टी नाटकांचा गरम मसाला आहे. ही लोकरंगभूमी प्रेक्षकांनी जागविली आणि जगविली. दंडारीची उत्पत्ती झाली. त्यातून नाट्यरूप आकाराला आले. शंकरपटापासून तर मंडईपर्यंत ही नाटके झाडीपट्टी व्यापून उरली. अलिकडे दिसणाऱ्या छत्तीसगडी हंगामा, डान्स हंगामा याबद्दल खंत व्यक्त करून ते म्हणाले, नाटकाचे सत्व हरविणार नाही, याची दखल घ्याला हवी. कशी जीवंत राहणार लोककला ?डॉ. श्याम मोहरकर यांनी हल्लीच्या मानसिकतेला संवेदनशिलपणे हात घालून खंत व्यक्त केली. ते म्हणाले, लोककलांनी माणसांचे जीवन समृद्ध केले. मात्र या लोककला आम्ही हरवत चाललो. दाराशी आलेल्या लोककलावंतांचा आवाज आमच्या टिव्हीच्या आवाजापुढे दबून जातो. उंच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आमच्या कानावर तर त्यांचा आवाजच पोहोचत नाही आणि पोहोचला तरी त्याला बिदागी देण्याची दानत आमच्यात राहीली नाही. कशी जीवंत राहणार लोककला?मासोळीचा वास किती दिवस घेणार ?डॉ. जयश्री कापसे यांनी फुलविक्रेती आणि मासोळी विकणाऱ्या दोन मैत्रिणींची गोष्ट सांगितली. एकदा मासोळी विक्रेती मैत्रिण फुलविक्रेत्या मैत्रिणीकडे मुक्काम करते. मात्र फुलांच्या वासाने तिला रात्रभर झोप येत नाही. अखेर ती आपल्या टोपल्यातील मासोळी काढून उशाशी घेते तेव्हा कुठे त्या परिचित वासाने तिला शांत झोप लागते. कापसे म्हणाल्या, हीच अवस्था झाडीपट्टी रंगभूमीची आहे. किती दिवस आपण मासोळीचा वास घेणार आहोत ? जरा चौकटीतून बाहेर या. कशी म्हणता द्विअर्थी नाटकं ?डॉ. जयश्री कापसे यांनी द्विअर्थी नाटकांच्या नावाबद्दल आणि संवादाबद्दल खंत व्यक्त केली होती. तो धागा पकडून वडपल्लीवार गुरूजी म्हणाले, नाटकांच्या द्विअर्थी नावाबद्दल चर्चा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात नाटकात मात्र असे कधीच दिसले नाही. आम्हीही सेन्सार झालेलीच नाटके करतो. तशी एकदोन नाटके लिहिली जात असतीलही, मात्र ती कुणी सादर करीत नाहीत. आमच्या नाटकांना फ्री पासची कधी गरज पडली नाही. झाडीपट्टीतील मंडळे आम्हीच जीवंत ठेवली, मात्र व्यावसायिक रंगभूने ही मंडळे मागे पाडली. गावच्या कलावंतावर प्रेक्षक बनण्याची पाळी आली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
झाडीपट्टी लोककलेच्या ऱ्हासाला आपणच जबाबदार
By admin | Published: January 31, 2016 12:55 AM