राजुरा : भारत हा तरुणांचा देश आहे. आज आपल्या देशात कृतिशील तरुणांची संख्या वाढत आहे. मात्र स्पर्धेच्या युगात वाढता व्याप, एकटेपणा, चुकीच्या माहितीवर विश्वास, कुतूहल यातून आजच्या पिढीतील कित्येक जण व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्याचे गंभीर परिणाम वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात उमटत आहेत. त्यामुळे उज्ज्वल भवितव्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरद्वारा आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येल्लो लाइन कँम्पेनिंगच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गटसाधन केंद्र राजुरा येथे शनिवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कँम्पेनिंगची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम राजुरा तालुक्यातून करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राजुरा तालुक्यातील ७५ शाळांची निवड करण्यात आली आहे. शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांवर आवश्यक संस्कार रुजविण्यात येणार आहेत. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, सभापती मुमताज जावेद अब्दुल, उपसभापती मंगेश गुरनुले, मानसशास्त्रज्ञ मित्रंजय निरंजने, बीईओ विजय परचाके, उपजिल्हा रुग्णालय राजुराचे अधीक्षक डॉ. लहू कुडमेथे, जिल्हा दंतशल्य चिकित्सक डॉ. आकाश कासटवार आदी उपस्थित होते.