लोकमत न्यूज नेटवर्क नागभीडः तुमची घोडाझरी अभयारण्यात निवड झाली आहे. मुलाखतीसाठी आपल्याला ९ जानेवारी २०२५ रोजी नागभीड तालुक्यातील घोडाझरी अभयारण्यात हजर राहायचे आहे, अशी एका अज्ञात व्यक्तीकडून बतावणी करण्यात आली. या बतावणीला बळी पडलेल्या या तरुणीने पुण्यावरून सरळ नागभीड गाठले. आणि नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कपाळावर हात मारून घेतल्याची घटना बुधवारी नागभीड येथे उघडकीस आली.
पूजा संतोष राजगुरू असे या तरुणीचे नाव असून, ती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. वनरक्षक पदासाठी तिने यापूर्वी पुणे विभागात अर्ज केला होता. नेमक्या या संधीचा फायदा घेत एका भामट्याने तरुणीला ऑक्टोबर महिन्यात फोन करून तुमची निवड घोडाझरी अभयारण्यात झाली आहे.
तुम्ही गणवेश खरेदी करून प्रशिक्षणास हजर राहा, असे फोन करून सांगितले. मात्र, एक-दोन दिवसातच आचारसंहितेमुळे तुमचे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती या व्यक्तीने तरुणीला फोनवरूनच दिली. दरम्यान, ४ जानेवारी २०२५ रोजी पुन्हा या तरुणीला त्याच व्यक्तीकडून फोन आला. आता आचारसंहिता संपली आहे, तुम्हाला ९ जानेवारीला घोडाझरीत प्रशिक्षणास हजर राहायचे आहे, असे सांगितले. विश्वास ठेवत ही तरूणी पुण्यावरून थेट नागभीड येथे आली. येथे येऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तिने कपाळावर हात मारून घेतला.
"तरूणी आपल्या पतीसोबत नागभीडच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात बुधवारी सकाळी आली आणि प्रशिक्षणाबाबत विचारू लागली. मात्र, असे कोणतेही प्रशिक्षण नसल्याची माहिती आमच्या कार्यालयाकडून देण्यात आली. त्यानंतर ती परत गेली." - अजय नेरलवार, क्षेत्र सहाय्यक, नागभीड