चंद्रपूर : संपत्तीचा लोभ सुटला तर त्यापुढे नातीही थिटी पडतात. सावली तालुक्यातील गायडोंगरी येथे घडला. लहान भावाने सख्खा मोठा भाऊ व वहिनीची हत्या केली. ही थरारक घटना सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. जमिनीच्या वादातून हे दुहेरी हत्याकांड घडले असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी धनराज निंबाजी गुरुनुले (५२) याला पाथरी पोलिसांनी अटक केली आहे. मनोहर निंबाजी गुरुनुले (६२) व शारदा मनोहर गुरुनुले (४०) अशी मृतकांची नावे आहेत.
मनोहर गुरुनुले व धनराज गुरुनुले हे दोघे भाऊ एकमेकांच्या शेजारीच राहायचे. घराच्या जागेवरुन या दोन भावडांत नेहमीच वाद व्हायचा. आज सकाळी घरी जाण्याच्या रस्त्यावरुन या दोन भावंडात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, लहान भाऊ धनराज याने मोठ्या भावाला बरशीने मारहाण करुन हात तोडला. मनोहर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. तरीही धनराज त्याच्यावर वार करीतच होता. हे भयावह दृश्य पाहून मनोहरची पत्नी शारदा धनराजच्या तावडीतून आपल्या पतीला सोडविण्यासाठी धावून गेली. अंगात शैतान संचारल्यागत धनराजने हातातील बरशीने तिच्याही डोक्यावर वार केला. तीसुद्धा रक्ताच्या थारोेळ्यात जमिनीवर कोसळली.
या घटनेची माहिती गायडोंगरीचे पोलीस पाटील गोकुलदास कावळे यांनी पाथरी पोलिसांना दिली. यानंतर पाथरी पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मनोहर व शारदा हे पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. पोलिसांनी दोघांनाही सावली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोहर गुरुनुले यांना मृत घोषित केले. तर शारदा गुरुनुले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पाहून तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली.
या घटनेचा पंचनामा उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार मंगेश मोहोड यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठून केला. या प्रकरणी भांदविच्या कलम ३०७, ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी धनराज गुरुनुले याला अटक करण्यात आहे. ही कारवाई ठाणेदार मंगेश मोहोड, नागराज येगेवार, वसंत नागरेकर, प्यारेलाल देवार, राजू केवट, अशोक मोहुले, जनार्धन मांदाळे आदींनी केली. पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या पथकाला बोलाविण्यात आले. त्यांनी काही नमूने गोळा केले आहेत. पुढील तपास ठाणेदार मंगेश मोहोड करीत आहेत.