चंद्रपूर : सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे सहसा कुणीही बाहेर पडण्याच्या भानगडीत पडत नाही. मात्र अशाही स्थितीत रेल्वे रुळाच्या कडेला भर उन्हात २४ तासांपासून तडफडत असलेल्या अपघातग्रस्त एका गाभण म्हशीला वाचविण्यासाठी प्यार फाउंडेशनच्या सदस्यांनी जिवाची बाजी लावून तब्बल तीन तास रेस्क्यू करीत तिला वाचविले. या कामासाठी मनपा आयुक्तांच्या आदेशानंतर उशिरा का, होईना महापालिका कर्मचाऱ्यांनीही हातभार लावला.
चंद्रपूर ते पडोलीदरम्यान लखमापूरच्या अलीकडे शुक्रवारी रेल्वेने चार म्हशींना धडक दिली. यातील तीन म्हशी घटनास्थळीच ठार झाल्या तर एक गाभण म्हैस रुळाच्या कडेला तडफडत होती. शनिवारी सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना ती दिसली. त्यांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर दूरवरून पाणी आणून पाजले. मात्र ती उठत नसल्याने येथील प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली यांनी माहिती दिली. त्यानंतर ते सदस्यांसह घटनास्थळी पोहोचले. मात्र ज्या ठिकाणी ही म्हैस होती त्या ठिकाणी दोन्ही रुळामध्ये तसेच दोन्ही बाजूने दरी असल्यामुळे म्हशीला काढणे मोठे जोखमीचे काम होते. सदस्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना फोन करून जेसीबी तसेच ट्रॅक्टरची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र म्हैशीची तडफड पहावली जात नसल्याने सदस्यांनी महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी व्हिडीओ काॅल करून तिची तडफड दाखविली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना जेसीबी तसेच ट्रॅक्टर घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कर्मचारी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रुळाच्या कडेला असलेल्या म्हशीला बेल्टच्या साहाय्याने अडकवून मोठ्या शिताफीने तिला बाहेर काढून औषधोपचार करण्यात आले.
बाॅक्स
थेट मनपा आयुक्तांनी घेतली दखल
अप आणि डाऊन रेल्वे रुळाच्या मध्ये अपघातग्रस्त म्हैस असल्याने तिला काढण्यासाठी जेसीबी किंवा क्रेनशिवाय पर्याय नव्हता. अशावेळी सदस्यांसह काही नागरिकांनी महापालिकडे जेसीबी तसेच ट्रॅक्टर पाठविण्याची मागणी केली. मात्र नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे फाउंडेशनच्या सदस्यांनी मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना थेट व्हिडिओ काॅल करीत अपघातग्रस्त म्हशीची तडफड दाखविली. आयुक्तांनी वेळ न दवडता आपल्या कर्मचाऱ्यांना जेसीबी तसेच ट्रॅक्टर त्वरित घेऊन जाण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर काही वेळातच जेसीपी तसेच ट्रॅक्टर घटनास्थळी पोहचले.
बाॅक्स
रात्री १० वाजेपर्यंत चालले रेस्क्यू
अपघातग्रस्त म्हैस रेल्वे रुळाच्या कडेला असल्याने तिला काढणे कठीण होते. त्यातच रेल्वेसारख्या धावत असल्यामुळे सदस्यांच्या जिवालाही धोका होता. त्यामुळे मोठी जोखीम उचलून योग्य नियोजन करून तिला बाहेर काढण्यात आले. या कामासाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ लागला.
बाॅक्स
या सदस्यांनी केली मदत
म्हशीला बाहेर काढण्यासाठी प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापल्ली यांच्यासह कुणाल महल्ले, निनाद डोंगरे, अर्पितसिंह ठाकूर, शीतल दुर्गे तर तुळशीनगरातील मधुकर येवले गुरुजी, पांडे गुरुजी, मंगेश ताजने आणि महापालिकेचे उपायुक्त, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, जेसीबीचालक, ट्रॅक्टरचालकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी या कामासाठी मदत केली.