जन विकास सेनेची गांधीगिरी : गुलाबपुष्प देऊन केला सत्कार
चंद्रपूर : जनविकास सेनेतर्फे चंद्रपूरमध्ये 'आपले शहर-कोरोनामुक्त शहर' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत नागरिकांना गुलाबपुष्प, तसेच मास्क देऊन गांधीगिरी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये मास्क लावण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जनविकासचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात भुषण फुसे, इमदाद शेख, मनीषा बोबडे, कांचन चिंचेकर, अक्षय येरगुडे, राहुल दडमल, गीतेश शेंडे, नीलेश पाझारे, कार्तिक दुरटकर, रवी काळे, स्वप्निल शेंडे आदी पदाधिकाऱ्यांनी गोल बाजारामध्ये मास्क न लावता फिरणाऱ्यांना गुलाबपुष्प, तसेच नवीन मास्क देऊन गांधीगिरी केली. गोल बाजारातील काही दुकानदार व दुकानात काम करणाऱ्यांनासुद्धा गुलाबपुष्प व नवीन मास्क देण्यात आले. नागरिकांनीसुद्धा गुलाबपुष्पाचा स्वीकार करून व तत्काळ नवीन मास्क लावून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील अनेक नागरिकांचे नाहक बळी गेले. अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. मात्र, गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. भविष्यात कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मास्क लावणे, अंतर नियमाचे पालन करणे, हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझर करणे, तसेच लस घेऊन स्वतःला सुरक्षित करणे हेच उपाय आहेत. शहरातील नागरिकांचे भविष्यात कोरोना विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी जनविकास सेनेतर्फे आपले शहर- कोरोनामुक्त शहर उपक्रमाची सुरुवात केली.
गोल बाजाराप्रमाणे चंद्रपूर शहरातील गंजवार्ड, बंगाली कॅम्प चौक, दाताळा रोडवरील भाजी मार्केट, एसटी वर्कशॉप चौक, जनता कॉलेज चौक, भिवापूर, सुपर मार्केट व बागला चौक, जटपुरा गेट आदी गर्दीच्या ठिकाणी उपक्रम राबविण्यात येणार आहे.