सास्ती :राजुरा शहरालगत वनविभागाच्या रोपवाटिकेकडे जाणाऱ्या जंगल रस्त्यावर शहरातील तळीरामांनी फेकलेल्या दारुच्या व पाण्याचा रिकाम्या बाटल्या, वेफर्सचे प्लास्टिक आवरण व अन्य साहित्य गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या युवकांनी पुढाकार घेत संपूर्ण रस्त्याची स्वच्छता करून एक आदर्श निर्माण केला.
शुद्ध हवा घेणे, व्यायाम करणे तसेच आरोग्याची निगा राखण्याच्या उद्देशाने शहरातील आबालवृद्ध रोज पहाटे व संध्याकाळी शहराच्या बाहेर असलेल्या व जंगलाला लागून असलेल्या या निसर्गसंपन्न परिसरात फेरफटका मारायला जातात. तसेच पोलीस व सैन्य भरतीच्या दृष्टीने धावण्याचा सराव तसेच व्यायाम करण्यासाठी अनेक युवक युवती या परिसरात सराव करतात. मात्र शहरातील तळीराम याच परिसरातील निर्जन वातावरणाचा गैरफायदा घेत झुडपांच्या आडोशाला व आतल्या रस्त्याच्या कडेला अंधारात मद्य प्राशन करतात व तिथेच दारूच्या बाटल्या, वेफर्सचे पाकिटे, प्लास्टिक ग्लास, सिगारेटचे पॅकेट इत्यादी वस्तू फेकून पसार होतात. या कचऱ्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांच्या आरोग्यावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बरोबरच शारीरिक तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणाऱ्या लोकांनाही अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या सर्व बाबींचा तरुणाईने संवेदनशीलतेने विचार करून इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम हाती घेत संपूर्ण रस्त्याची स्वच्छता केली. याप्रसंगी चेतन सातपुते, सतीश बानकर, जगदीश साठोने, आकाश वाटेवर, भूपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, प्रज्वल उराडे, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम, बंडू बोडे, पचारे, अक्षय गावंडे उपस्थित होते.