चंद्रपूर : एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या व्हाॅट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवला. यानंतर गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. समाजमन सुन्न करणारी ही घटना सिंदेवाहीत तालुक्यातील रत्नापूर येथे मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश भालचंद्र चावरे असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
दिनेश चावरे हा सुशिक्षित तरुण. २०२० मध्ये कृषी विभागात कृषिसेवक पदासाठी निवड झाली. निवड झाल्याचे पत्रही मिळाले होते. त्याच कालावधीत त्याला ऑस्टिओमायलिटिस (Osteomyelitis) नावाचा आजार दुर्धर जडला. या आजाराने त्याचा जीव जावू नये, म्हणून डाॅक्टरांच्या सल्ल्याने त्याचा पाय कापावा लागत होता. त्याचा एक पाय कंबरेपासून पूर्णपणे कापला गेला. दोन पायाने धडपडणाऱ्या दिनेशला कुबड्या लागल्या. या आजाराने त्याला असह्य वेदना व्हायच्या. आई- वडिलांनाही हे बघवत नव्हते. या आजारातून मुक्तता व्हावी, म्हणून उपचारावर सुमारे पंधरा लाख रुपये खर्च झाला; परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही यश आले नाही.
घरची परिस्थिती, होणारा खर्च, सततच्या असह्य वेदनेला दिनेश कंटाळला होता. दिनेशने मंगळवारी ६:२३ मिनिटाला आपल्या व्हाॅट्सॲपवर जळत्या चितेचा फोटो अपलोड केला आणि त्याखाली याच्यासाठी, त्याच्यासाठी, नुसताच पळत होता. सगळेच गेले घरी निघून हा एकटाच जळत होता, असा भावनिक संदेश लिहिला. त्याचा अखेरचा हा संदेश कुणालाही कळला नाही. त्याच रात्री १२ वाजेच्या सुमारास गावातीलच सार्वजनिक विहिरीमध्ये दिनेशने उडी घेऊन जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम संपवला.
ही घटना उघड होताच सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्याच्या मृत्यूपश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. बुधवारी दुपारी रत्नापूर येथील स्मशानभूमीत दिनेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. होतकरू तरुण मुलाने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिनेशचा वेदनादायी संघर्ष
आई-वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी दिनेश चावरे या तरुणाने कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. तंत्रनिकेतनचे शिक्षण सुरू असताना त्याने कृषिसेवक पदासाठी परीक्षा दिली. यात तो उत्तीर्णही झाला. त्याला नोकरीवर रूजू होण्याचे पत्रही मिळाले. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, नियतीला काही ओरच हवे होते. त्याला ऑस्टिओमायलिटिस आजाराने पछाडले. या होतकरू तरुणाला नंतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा, म्हणून दिव्यांग प्रमाणपत्रासाठी प्रशासनाकडे धडपड करावी लागत होती.