चिमूर : येथील क्रांतीनगरमध्ये अवैधरित्या रेती साठविल्याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीसाठ्याचा पंचनामा केला. युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने ही रेती चोरी उघडकीस आली. चिमूर नगर परिषद हद्दीतील क्रांतीनगरमध्ये रस्ता व घराच्या बांधकामासाठी विना रॉयल्टीने रेती आणून ठेवल्याचा संशय येताच, युवक काँग्रेसचे शहर सचिव विलास मोहिनकर यांनी उपविभागीय अधिकारी संगीता राठोड यांना माहिती दिली. संगीता राठोड यांनी घटनास्थळी येथील कीह राजकीय कार्यकर्त्यांच्या व काही नागरिकांच्या घरासमोर अवैध रेतीच्या ढिगाऱ्यांची पाहणी केली. त्यात एकूण १३८ ब्रास रेतीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले आले. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विलास मोहीनकर यांनी केली आहे.पंचनामा व मोका चौकशी तलाठ्यामार्फत करण्यात आली. मल्लेवार यांच्या घराच्या उत्तर दिशेला सुनिल लोथे यांच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी अंदाजे १७ ब्रास रेतीचा ढिग आढळून आला. तसेच क्रांतीनगरमधील हनुमान मंदीरासमोर पाच ब्रास, प्रदीप जुमडे यांच्या घरासमोर चार ब्रास, नगर परिषद कर्मचारी बालू राहूलवार यांच्या घरासमोर एक ब्रास, शेषराव गाडेकर यांच्या घरासमोर सहा ब्रास, प्रफुल्ल कावरे यांच्या घरासमोर सात ब्रास रेती, पंधरे यांच्या पश्चिम भागाला असलेल्या बांधकामासमोर दोन ब्रास रेती आढळून आली. तसेच सत्यम टायर्स यांच्या प्लॉटवर एक ब्रास रेती आढळून आली. गुरनुले यांच्या घराच्या पूर्व भागाला १५ ब्रास रेतीचा ढिग आढळून आले. बंटी वनकर यांच्या घरासमोर दोन ब्रास रेती आढळून आली. तालुका क्रीडा संकूल चिमूर इमारतीच्या समोर दक्षिण दिशेला दोन ब्रास रेतीचा ढिग आढळून आले. धनराज राऊत यांच्या घराच्या बांधकामासमोर दोन ब्रास रेतीचा ढिग आढळून आला. सुरेश डाहुले यांच्या घराच्या नवीन बांधकामासमोर चार ब्रास रेतीचा ढिग आढळून आला. अशी १३८ ब्रास रेती आढळून आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून विना रॉयल्टी रेतीच्या वापर करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विलास मोहीनकर यांनी केली आहे. (लोकमत चमू)
अवैध रेती साठाप्रकरणी कारवाई करण्याची युवक कॉंग्रेसची मागणी
By admin | Published: June 01, 2016 1:25 AM