वेदांत मेहरकुळे गोंडपिपरीगेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण शहरात घनकचरा व सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व आरोग्यास अपायकारक बाबींकडे येथील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे शहरातीलच काही युवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून अखेर शहर स्वच्छतेचा विडा उचलेला आहे. पहाटेच गावात स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ व्हायला लागला आहे. महिनाभरापासून हा क्रम अविरत सुरू असून ग्रामपंचायतीने मात्र जबाबदारी झटकल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या वतीने ग्रावखेड्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता ग्राम विकास विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्चून अनेक कल्याणकारी योजना अमंलात आणल्या आहेत. मात्र जनकल्याणकारी योजनाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या पंचायत समित्या व ग्रामपंचायतींनी भ्रष्ट व दुर्लक्षित धोरणातून अनेक गावात योजनांचा बट्ट्याबोळ केल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून येते. अशातच गोंडपिपरी या तालुकास्तर असलेल्या शहरात ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते.शहरात अस्वच्छतेच्या साम्राज्याला तोंड देण्यास ग्रामपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असताना शहरातील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक तेजराव पाटील व अरुण वासलवार यांनी शहरातील युवा मंडळींचा मेळ घालत राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून दैनंदिन स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा उचलला.प्रारंभी चार ते पाच युवकांनी हे कार्य सुरू केले. त्यानंतर इतर युवकांनीही अभियानात सहभागी होऊन स्वच्छता मोहिमेस हातभार लावणे सुरू केले. १ एप्रिलपासून ही मोहीम सुरू करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला जात आहे. या मोहिमेत आज २२ हून अधिक युवक सहभागी आहेत. अगदी पहाटेच सदर मंडळी एकत्रित येऊन रोज एक तास स्वच्छता अभियान राबवितात. याच दरम्यान मोहिमेत कुठल्याही महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथी असल्यास किंवा मोहिमेतील सदस्यांचा जन्मदिवस असल्यास अतिरिक्त श्रमदान केले जाते, हे विशेष.एक दिवस अभियान राबविताना स्वच्छ केलेल्या परिसरात खुद्द ग्रामपंचायत कर्मचारीच नालीतील घाण टाकून पसार झाले. मात्र मोहिमेतील सदस्यांनी पुन्हा ती घाण साफ करुन ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार धोरणाला शांततेने व कामातून प्रत्युत्तर दिले.या युवकांनी केलेले काम आता इतर गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून युवकांनी उचलला शहर स्वच्छतेचा विडा
By admin | Published: May 25, 2015 1:37 AM