चंद्रपूर : चंगळवादाकडे झुकलेल्या युवापिढीने अंर्तमुख होवून या जीवनाचे काय करु, या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची आणि जीवनाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांनी केले. ‘एक महिना एक कार्यक्रम’ या सृजनच्या व्रताच्या अंतर्गत डॉ. बंग यांचे व्याख्यान आयोजित करण्या आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ. बंग पुढे म्हणाले की, जीवन म्हणजे केवळ स्वत:साठी जगणे नसून ते इतरांसाठी जगणे होय. आजच्या युवाला फक्त स्वत:च्याच भवितव्याची काळजी आहे. त्याला देशाचा व समाजाचा विचार करावासा वाटत नाही, ही शोकांतिका असल्याचे सांगत, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात ही स्वत:पासूनच होत असते. त्यामुळे दुसरा कोणी परिवर्तनाच्या दिशेने पाऊल उचलेल, असा विचार न करता पहिले पाऊल स्वत:चेच टाकण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.याखेरीजही त्यांनी अनेक मुद्द्यांचा परामर्श घेत उपस्थितांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात डॉ. बंग यांनी रसिकांशी संवादही साधला. चित्रकार सुदर्शन बारापात्रे यांनी काढलेले डॉ. बंग यांचे तैलचित्र बारापात्रेंच्या पत्नी अर्चना बारापात्रे यांनी आणि चित्रकार चंदू पाठक यांनी काढलेले डॉ. बंग यांचे रेखाचित्र त्यांची पत्नी वीणा पाठक यांनी सृजनतर्फे भेट म्हणून दिले. संचालन श्वेता चावरे यांनी केले. या सलग ९४ व्या अभ्यासपूर्ण कार्यक्रमाला शहरातीलच नव्हे तर सभोवतालच्या परिसरातील रसिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सृजनचा ९५ वा कार्यक्रम २६ मार्च रोजी होवू घातलेला असून, या कार्यक्रमात आनंदवनचे समर्पित कार्यकर्ते आणि महारोगी सेवा समिती, वरोराचे विश्वस्त सुधाकर कडू ‘ मी अनुभवलेले आनंदवन’, या विषयावर होणार आहे. (प्रतिनिधी)
युवकांनी जीवनाविषयी सकारात्मक असावे -बंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2017 12:42 AM