- साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : एका मोकाट श्वानाला मारण्याच्या इराद्याने अज्ञातांनी त्याला तलवारीने घाव घातले. एवढेच नाही तर त्याच्या छातीमध्ये आरपार तलवार घुसवून त्याला मोकाट सोडून देण्यात आले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले. दरम्यान, चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याला मदत करण्याचा निश्चय केला. यासाठी सदस्यांनी शोध मोहीम राबविली. तो उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात पेंढूर्णा येथील असल्याची माहिती मिळताच दोन सदस्य थेट विमानाने तिथे पोहचले.
तब्बल १८ तासाची शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेत त्याच्यावर उपचार केला. यामुळे श्वानाला जीवनदान मिळाले. एका मुक्या मोकाट प्राण्यासाठी शेकडो मैल दूर प्रवास करून चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी उपचार केले. या त्यांच्या कार्याला पेंढूर्णा येथील महापौरांसह तेथील प्रशासनाने सलाम केला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आठ ते दहा दिवसापूर्वी सोशल मिडियावर एका श्वानाचा फोटो व्हायरल झाला. यामध्ये जखमी असलेल्या श्वानाच्या छातीतून एक तलवार आरपार गेली होती. मरणाच्या दाराला मारेकऱ्यांनी त्याला सोडून पळ काढला. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेतील तो श्वान छातीत तलवार घेऊन इकडून तिकडे सारखा फिरत होता. याबाबतचा व्हिडिओ चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना दिसला. त्यांनी लगेच या श्वानाची मदत करण्याचे ठाणले. त्यानंतर शोध मोहीम सुरु केली. तो उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील पेंढूर्णा येथील असल्याचे सद्स्यांच्या लक्षात आले.
वेळ न दवडता तत्काळ प्यार फाऊंडेशनचे सदस्य अर्पित ठाकूर, कुणाल महर्ले हे विमानाने उत्तरप्रदेशात पोहचले. त्यानंतर पेंढूर्णा येथे जात त्याचा शोध सुरु केला. मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर सदस्यांनी येथील प्रशासनाला याबाबत कळवून महापौरांची भेट घेत त्यांची मदत मागितली. त्यानंतर तब्बल १८ तासाच्या शोधमोहीमेनंतर एका रस्त्याच्या कडेल छातीत तलवार घुसलेल्या अवस्थेत तो त्यांना आढळला. सदस्यांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडून
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर शस्त्रक्रीया करून त्याच्या छातीतील तलवार काढली.त्यानंतर औषधोपचार सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे, जखमी असलेल्या त्या श्वानाला आता चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनमध्ये आणण्यात येणार असून चंद्रपूर येथे त्याच्यावर पुढील उपचार केले जाणार आहे. चंद्रपूर येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी एका मुका प्राण्याच्या जीवासाठी दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे.
पेंढूर्णाच्या महापौरांचीही मदतजखमी असलेल्या श्वानाला पकडण्यासाठी सदस्यांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, येथील महापौर जयस्वाल यांना याबाबत सदस्यांनी माहिती दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱी, कर्मचाऱ्यांसह स्वत: त्या श्वानाच्या मदतीसाठी पोहचले. विशेष म्हणजे, त्यांनी प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांचे कौतूक करीत पूर्ण मदत केली.
पोलीस प्रशासनाने दाखविली तत्परताचंद्रपूर येथील दोन सदस्य उत्तर प्रदेशातील पेंढूर्णा येथे पोहचल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. नवीन गाव असल्यामुळे श्वासाला पकडणे मोठे अपघात काम होते. त्यामुळे सदस्यांनी तेथील पोलीस प्रशासनाची मदत घेत श्वानाला पकडण्याचे काम फत्ते केले.
एका श्वानाच्या छातीमध्ये आरपार तलवार असल्याचे बघून मन हळहळले. त्यामुळे त्याच्या मदतीसाठी येथील दोन सदस्यांना विमानाने पाठवून त्याचा शोध घेण्यात आला. त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार करायचे याबाबत फोनद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. सध्या तो श्वान धोक्याबाहेर असून त्याला लवकरच चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी आणण्यात येणार आहे. नागरिकांनी मोकाट प्राण्यांवर अशा क्रृर प्रद्धतीने वागू नये. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना मुक्तपणे जगू द्यावे.- देवेंद्र रापेल्लीअध्यक्ष, प्यार फाऊंडेशन, चंद्रपूर