चंद्रपूर : येथील जयंत टाकीज चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झी बाजारला पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १७ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जेसीबीच्या इमारतीचे छत तोडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सकाळपर्यंत सुरूच होता.
याच झी बाजारला लागून तिबेटीयन लोकांचे उनी कपड्यांचे दुकान लागले होते मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने उनी कपड्यांचे गाठोडे बांधून ते रस्त्यावर जमा करून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला . चंद्रपूर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाल्याने लोकांची गर्दी आटोक्यात ठेवण्यात पोलिसांना यश आले. सदर झी बाजार हे मागील महिन्यात बंद होते आता पुन्हा नुकतेच सुरू झाले होते.