पळसगाव (पिपर्डा) : जगभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही शेकडो लोकांचा त्यात बळी गेला आहे. किमान लॉकडाऊन काळात तरी जीवाच्या भीतीने अवैध धंदे बंद असावे, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात यातील अनेक अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. जुगार अड्डेही अनेक ठिकाणी बहरले आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असून, शिक्षकही शाळेकडे फिरकत नाहीत. त्यामुळे शाळेला कोणी वाली नाही, अशीच स्थिती दिसत आहे.
नेमकी हीच संधी साधून गावातील टवाळखोर लहान मुले विद्येचे माहेरघर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बिनधास्तपणे जुगार पत्ते खेळताना दिसत आहेत. शाळा जुगाराचा अड्डा बनला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. हे जुगार अड्डे धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण तेथूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.