चंद्रपूर : चहुबाजूंनी कॉन्व्हेंट संस्कृतीचे पीक आल्यामुळे मराठी शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांशिवाय पर्याय नसला तरी अनेक जण तालुकास्थळावर आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवित आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची आवड निर्माण व्हावी, अशा १३३ शाळा पहिल्या टप्प्यात मॉडेल करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केला आहे.मिशन नवचेतनातंर्गत लोकसहभाग, सीएसआर फंड आणि जिल्हा परिषदेच्या निधीतून प्रत्येक केंद्रातील एक शाळा येत्या मार्च महिन्यापर्यंत स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक दिसणार आहे. या मॉडेल शाळांमधील भिंती विद्यार्थ्यांशी बोलणार असून बालस्नेही शाळा तयार होणार असल्याने विद्यार्थ्यांनाच या शाळांमध्ये विद्यार्जनासाठी जाणे हवेहवेशी वाटणार आहे.जिल्हा परिषदेत पाच महिन्यांपूर्वी रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून शिक्षण विभाग पुढील पाच महिन्यात या मॉडेल स्कूल तयार करणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३३ शाळांची निवड करण्यात आली असून सर्वांगीण दृष्टीने या शाळा इतर शाळांसाठी आदर्श ठरणार आहे. मॉडेल शाळांमध्ये प्रारंभी बोलक्या भिंती तयार केल्या जाणार आहेत. शाळांमधील भिंतीवर स्लोगन व चित्र रेखाटल्या जाणार असून शाळेचा बाहेरील परिसरही आकर्षक केल्या जाणार आहे. प्रत्येक वर्गखोलीत विषय कोपरे तयार करण्यासह शाळेच्या प्रांगणात बगिचासुद्धा फुलविला जाणार आहे. शाळेच्या आतील भागात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने भरपूर साहित्य ठेवले जाणार असून बालवाचनालय व बोबडे फलकही तयार केले जाणार आहेत. जमिनीपासून दोन ते अडीच फुटाच्या अंतरावर हे फलक निर्माण करून विद्यार्थी त्यावर चित्र काढून लिहिणार आहेत. बालवाचनालयात ठेवलेल्या पुस्तकांवर आधारित उपक्रम राबविल्या जाणार असून छोटीशी प्रयोगशाळासुद्धा या मॉडेल शाळांमध्ये राहणार आहे. कॅरम, चेस, ब्रेनव्हिटा यासारखे इंडोर गेम व स्पोर्टस किट्स प्रत्येक शाळेला दिले जाणार आहे. याबाबतचे प्रशिक्षण संबंधित शिक्षकांना देऊन विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.येत्या मार्च महिन्यापर्यंत या १३३ शाळा मॉडेल म्हणून उदयास आल्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर शाळांचाही विचार केला जाणार आहे. मिशन नवचेतनातंर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून वेगवेगळ्या अंगाने या शाळा मॉडेल होण्यासाठी निकष ठरविण्यात आले आहे. त्या अंतर्गत ८ ते १० उपक्रम नियमितपणे या शाळामध्ये राबविल्या जाणार आहे.यापैकी मोठ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यासह शाळा नायक व नायिका ही संकल्पनाही राबविली जाणार असून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यामुळे येत्या मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील इतर जिल्हा परिषद शाळांसाठी सदर मॉडेल स्कूल नक्कीच आदर्श ठरणार असून विदर्भात जिल्ह्याचे नावलौकिक होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या १३३ शाळा बनणार मॉडेल
By admin | Published: October 26, 2015 1:16 AM