लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला. मागील वर्षी २ कोटी वृक्षरोपणाचे काम पूर्ण केले, तर यावर्षी राज्यात ४ कोटी वृक्षरोपणाचे काम पूर्ण करायचे आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावात ४ लक्ष ८० हजार वृक्षलागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रपुर जिल्ह्यात वृक्षलागवडीचा शुभारंभ १ जुलै रोजी पोभुर्णा तालुक्यातील घनोटी या गावातून करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गावागावात मंगळवारपासून ‘वृक्षदिंडी २०१७’ चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता होणार आहे. चित्ररथाला जि. प. अध्यक्ष भोंगळे हिरवी झेंडी दाखवतील. वृक्षदिंडीच्या माध्यमातून गावस्तरावर वृक्षलागवड सभा, बैठका घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला जाणार आहे. शिवाय पदाधिकारी व अधिकारी यांच्याद्वारा प्रत्येक तालुक्यातील दोन ते तीन गावात जावून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केली जाणार आहे. वृक्षरोपणानंतर ते वृक्ष जगविण्याचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. नरेगामधून वृक्षरोपणासाठी खड्डे खोदकामाचे सुरू आहे. पंचायत समिती परिसरात १०० वृक्ष याप्रमाणे १५०० वृक्ष, शिक्षण विभाग ४५ हजार ९३० पशुसंवर्धन विभाग १ हजार ४३५, आरोग्य विभाग २ हजार ५२५, महिला व बालकल्याण विभाग ११ हजार ८९९, समाजकल्याण विभाग १ हजार ३२०, बांधकाम विभाग २ हजार ३० असे एकूण ६६ हजार ६३९ वृक्षारोपणाचे नियोजन विविध विभागाचे असून उर्वरित वृक्ष जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायती अतर्गत लावण्यात येईल. यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात ४ लक्ष ८० हजारवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण कार्यक्रम जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज असून,यासाठी प्रत्येक तालुक्या करिता जिल्हास्तरावरील विभाग प्रमुखांवर एका तालुक्याची संपर्क अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड यांना नेमण्यात आले आहे, अशी माहितीही जि.प. अध्यक्ष भोंगळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, अर्थ व बांधकाम सभापती तंगडपल्लीवार, समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नरेगाचे संजय बोदेले उपस्थित होते.
जि.प. करणार ४ लक्ष ८० हजार वृक्ष लागवड, आजपासून वृक्षदिंडी
By admin | Published: June 27, 2017 12:46 AM