चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील बहुतांश विभागप्रमुख अधिकाऱ्यांना आता बदल्यांचे वेध लागले आहेत.गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चालू आठवड्यात बदल्यांचे आॅर्डर मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), प्रकल्प संचालक (डीआरडीए), मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे आहेत. कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सोडले तर, उर्वरित सर्वच विभागप्रमुखांनी तीन-चार वर्षे येथे सेवा दिली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेत बदल्यांचे सत्र आटोपले. या सत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपसी, विनंतीचा अर्ज केला होता. तीन-चार वर्षे सेवा झाल्याने हे अधिकारी आता बदलीस पात्र ठरले आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांना आता बदल्यांचे वेध लागले आहेत. मागील काही दिवसांत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची बदली नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून झाली आहे. शिक्षणाधिकारी देशपांडे (माध्यमिक) यांची बदली नांदेड जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून झाली आहे. पशुसंवर्धन अधिकारी सहारे यांची बदली भंडारा येथे झाली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी गिरी यांची बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून बदली झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अंकुश केदार, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता गव्हाणकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक बोंद्रे यांचीही बदली होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)
जि.प. अधिकाऱ्यांना लागले बदल्यांचे वेध
By admin | Published: June 23, 2014 12:00 AM