आकस्मिक भेट : आरोग्य केंद्रात डॉक्टरच नव्हतेवरोरा : प्राथमिक आरोग्य केंद्रास आकस्मिक भेट देण्यास गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य डॉ. आसावरी देवतळे यांना कोसरसार आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी दिसून आला नाही. काही रुग्ण वेदनेने विव्हळत असताना दिसल्याने त्यांनीच स्वत: रुग्णांवर औषधोपचार केला. या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राची दुरवस्था दिसून येते.जि.प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे आपल्या खांबाडा क्षेत्रातील मतदार संघात फिरत असताना त्यांनी कोसरसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारी सायंकाळी आकस्मिक भेट दिली. भेटीदरम्यान या आरोग्य केंद्रात सफाई कामगाराशिवाय कोणताही वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. या दरम्यान शितल विशाल झाडे नामक गर्भवती महिलेस उलटी व पोटदुखीचा असह्य त्रास होत असल्याने ती दवाखान्यात आली होती. मात्र दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नसल्याने सदर महिला विवंचनेत पडली. मात्र परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून डॉ. आसावरी देवतळे यांनी लोकप्रतिनिधीचा प्रतिष्ठेचा आव बाजूला सारून सदर रुग्णांची तपासणी केली. स्वत: स्त्री रोग तज्ज्ञ असलेल्या डॉ. आसावरी देवतळे यांनी महिलेवर औषधोपचार केला.त्यानंतर आसावरी देवतळे यांनी चंद्रपूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दूरवस्थेबाबत तत्काळ माहिती दिली व संबंधितांवर कार्यवाहीची मागणी केली. या दवाखान्यातील नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्याकडे भार सोपविल्याची माहिती आहे.
जि.प. सदस्यांनाच करावा लागला उपचार
By admin | Published: July 02, 2017 12:44 AM