छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा येथे रामनवमीच्या रात्री (२९ मार्च) पोलिसांवर दगडफेक करून जाळपोळ करून नुकसान करण्यात आले होते. ही जाळपोळ करणाऱ्या ७४ आरोपींकडून १ कोटी १० लाख ६०हजार ९२५ रुपये वसूल करण्याचे पत्र पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. आरोपींचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्याकडून मालमत्ता कराच्या रूपाने वसुली करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहेत.
२९ मार्चच्या रात्री एका जमावाने किराडपुरा येथे दगडफेक करीत पोलिसांत्या १५ वाहनांची जाळपोळ केली होती. यासोबतच तीन मोटारसायकलींसह अन्य खासगी वाहने जाळली होती. तेथील पाेलिस आयुक्तांच्या सीसीटीव्हीचे कमांड ॲण्ड कंट्रोलचे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान करण्यात आले होते. विविध दुकानांचे बॅनर, ट्युबलाइट, एलईडीसह अन्य सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान केले होते. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून विशेष पथकाने आरोपींना अटक केली आहे. पाेलिसांनी केलेल्या तपासात या घटनेत १ कोटी १० लाख ६० हजार ९२५ रुपयांचे नुकसान आरोपींनी केले.
शासनाच्या नियमानुसार अशा जाळपोळ करणाऱ्या आरोपींकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची तरतूद आहे. यानुसार पोलिस आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून या घटनेतील ७४ आरोपींकडून १ कोटी १० लाख ६० हजार ९२५ रुपये वसूल करण्याचे सांगितले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही सुरू केली आहे.
महापालिकेमार्फत होणार वसुलीशहरातील रहिवासी आरोपींकडील वसुली महापालिकेमार्फत केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली. ते म्हणाले की, आरोपींच्या मालमत्ता करासोबत ही नुकसान भरपाई वसूल करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी सर्व आरोपींचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी घेतील. आरोपींचा या कृत्यात किती आणि कसा सहभाग होता, त्यांच्या सहभागाचे पोलिसांकडे काय पुरावे आहेत, आदी बाबींचा विचार करून वसुलीचे आदेश मनपा आयुक्तांना देतील.