औरंगाबाद / बीड : गेल्यावर्षी मे महिन्यांत झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ८ कोटी १८ लाखांचा गैरव्यवहार रोखल्याची माहिती चौकशीअंती समोर आली असून याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडेय यांच्यासह १४ जणांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. जानेवारी २०२० पासून हे प्रकरण गाजत असून, विभागीय पातळीपासून निवडणुक आयोगापर्यंत तक्रारी गेल्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती.
तत्कालीन जिल्हाधिकारी पांडेय यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीणकुमार धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर ( माजलगाव ) प्रभोदय मुळे ( बीड ) नम्रता चाटे ( पाटोदा ) शोभा जाधव (अंबाजोगाई) गणेश महाडिक (परळी वैजीनाथ ) यांना जबाबदार धरले आहे. याशिवाय संगीता चव्हाण ( गेवराई ) प्रतिभा गोरे (माजलगाव) अविनाश शिंगटे ( बीड) हिरामण झिरवाळ (आष्टी) मेंडके (केज) बिपीन पाटील (परळी) या सहा तहसीलदारांवर ठपका ठेवला आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित देशमुख यांनी याप्रकरणात आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणुकीचा नऊ विविध शीर्षकाखाली १६ कोटी ५३ लाख रुपये खर्च दाखविला होता. त्यातला ८ कोटी १८ लाख रुपये खर्च चौकशी समितीने वगळला असून ८ कोटी ९ लाख रुपये खर्चाच्या बारा मुद्यांवर आधारित चौकशी झाली. पाच सदस्यीय चौकशी समितीने अन्य एका तक्रारीत क्लीनचीट दिल्यानंतर पुन्हा नियुक्त सहा सदस्यीय समितीने अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला. यात सरकारचे तब्बल ८ कोटी १८ लाख ९ हजार ७४० रुपये वाचले असल्याचे ॲड. देशमुख यांनी सांगितले. निवडणुक खर्चातील देण्यात आलेल्या बिलांच्या पडताळणीअंती मोठ्या प्रमाणावर खर्च कपात केल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लोकमतला दिली.
चहा, भोजनात १ कोटींचे शिल्लक बिलवेब कास्टिंगमध्ये २ कोटी २० लाख १३ हजार ८४४ बिल होते. यात १ कोटी ८० लाख १० लाख ३४४ रुपये अतिरिक्त होते. जी.पी.एस.साठी ४७ लाख ९७,१३५ रुपयांचे देयक जोडले. त्यात १९ लाख १८,८४९ रुपये अतिरिक्त होते. मंडप, फर्निचर, लाईटचे देयक ६,६०,३०,२६९ होते. यात ३,४५,११,६१० रुपये, व्हिडीओ कॅमेराचे देयक १,९३,५४,६८० लावले होते, यात १,२०,९६,९८६ रुपये तर चहा, नाष्टा, भोजनचे २,००,७३,९३९ देयक होते. यात १,०८,१२,१९० रुपये अतिरिक्त लावले होते. संगणक, प्रिंटर, एल. सी. डी., डिश टीव्ही, सीसीटीव्हीचे देयक १,६१,५९,००९ होते. यात २७,९३,३३१ रुपये, खाजगी वाहन पुरवठाचे ६८,१३,००० देयक होते, यात ३,५२,६०० रुपये अतिरिक्त होते. साहित्य, स्टेशनरीचे ४९,५५,७१० देयक सादर केले होते हे मान्य झाले. हमाल, मजूर पुरवठा देयक ५१,१८,२०० सादर केले होते. यात १३,१३,८३० रुपये चौकशीअंती कमी झाले आहेत.