औरंगाबाद : कोरोना संकट काळात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात १८ पेक्षा अधिक क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली होती. क्वारंटाईन सेंटरमध्ये नागरिकांसाठी पुरविण्यात आलेल्या गाद्या, उशा, बकेट, टीव्ही, फ्रिज, रेडिओ, माइक सिस्टिम, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी १ कोटी रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मार्च २०२० मध्ये शहरात कोरोना संसर्ग सुरू झाला. महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर स्वतःच्या मालकीच्या इमारतींमध्ये, विविध शासकीय कार्यालये, खासगी संस्थेच्या इमारतीमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना १४ दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत दर्जेदार सेवा देण्यात आली. क्वारंटाईन सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांसाठी महापालिकेच्या स्टोअर विभागाकडून ४ हजार गाद्या, ४ हजार उशा, ४ हजार कीट, ज्यामध्ये साबण, टूथब्रश, कंगवा, तेल आदी साहित्य होते. बकेट १७००, मग १७००, पिलोकव्हर ८ हजार, बेडशीट ८ हजार, माइक सिस्टिम १०, रेडिओ १०, टीव्ही १०, फ्रिज ६, संगणक ६, पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, ऑक्सिजन फ्लो मीटर आदी शेकडो साहित्य देण्यात आले होते. शहरातील बहुतांश क्वारंटाईन सेंटर्स महापालिकेकडून, रुग्ण नसल्यामुळे बंद करण्यात आली आहेत. सेंटर्स बंद केल्यानंतर संबंधित साहित्य महापालिकेकडे परत जमा होणे गरजेचे होते. पण आतापर्यंत एकही साहित्य महापालिकेकडे जमा झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९० टक्के साहित्य चोरीला गेले आहे. जवळपास एक कोटी रुपयांचे साहित्य गेले कुठे, असा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे.
देवगिरी हॉस्टेल येथे विद्यार्थ्यांच्या सामानाची चोरी
देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोरोना रुग्णांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे साहित्य कपाटामध्ये बंद करण्यात आले होते. कपाटातील ते सर्व साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले होते.
समाजकल्याणच्या इमारतीमधून ८६ फॅन चोरीला
किलेअर्क येथे समाजकल्याण विभागाची इमारत महापालिकेने घेतली होती. या इमारतीमधील जवळपास ८६ सिलिंग फॅन चोरीला गेले आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहित्य गेले कुठे? तपासणी होणार
महापालिकेने कोरोना रुग्णांसाठी दिलेले साहित्य गेले कोठे, याची तपासणी करण्यात येईल. स्टोअर आणि आरोग्य विभागाची ही जबाबदारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दिलेले साहित्य परत महापालिका मुख्यालयात जमा होणे गरजेचे आहे.
- सखाराम पानझडे, शहर अभियंता, महापालिका.