वाळूज महानगर : परभणी जिल्ह्यातून नाशिककडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेला ट्रक सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास महामार्गावरील तीसगाव चौफुलीवरील दुभाजकाला धडकून उलटला. या अपघातात एक जण ठार झाला असून ४० वऱ्हाडी जखमी झाले. तिघा गंभीर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विठ्ठल भदरगे (६० रा. रावळगाव, ता. सेलू, जि. परभणी) यांचा मोठा मुलगा राणाप्रताप याचा विवाह नाशिक येथे सोमवारी आयोजित करण्यात आला. या समारंभाला हजर राहण्यासाठी ट्रक (क्रमांक एम.एच.-१५, सी.के. ७४५२) मध्ये जवळपास ५० नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींना घेऊन चालक अमोल भगवान टोनराज हा रविवारी रात्री रावळगाव येथून नाशिककडे जाण्यासाठी निघाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास तीसगाव चौफुलीजवळील दुभाजकावर धडकून उलटला. साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडींनी मदतीसाठी आरडाओरड केला. त्यामुळे लगतच्या शेतवस्तीवरील तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले व घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. एमआयडीसी वाळूज, दौलताबाद, सातारा या पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत जखमी वऱ्हाडींना धीर देत त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी अपघातस्थळी भेट देऊन नंतर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.गंभीर जखमी झालेल्या राजू भीमराव भदरगे (२५, रा. रावळगाव, ता. सेलू, जि. परभणी), यास रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. ४सत्यशीला विजय भदरगे (३५, रा. वरखेड), शीतल अमोल टोनराज (२४, रा. पंचवटी, नाशिक), अविनाश भदरगे (२४), सुरेश राक्षे (३५), गौतम भदरगे (४६), द्वारकाबाई भदरगे (४०), विजय रामभाऊ भदरगे (४०), कैलास रंगनाथ वाघमारे (२५), रावसाहेब जिजाऊ भदरगे (४०), भागूबाई कठाळू मुनेरे (६०, सर्व रा. रावळगाव, ता. सेलू) यांच्यासह ट्रकमधील ३० ते ४० वऱ्हाडी जखमी झाले. यातील ३ वऱ्हाडींची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१ ठार, ४० वऱ्हाडी जखमी
By admin | Published: May 03, 2016 12:42 AM