औरंगाबाद : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी व्यस्त असून, पाण्याच्या उपलब्धतेच्या अंदाजानुसार पेरण्यांना सुरुवात झाली आहे. कृषी विभाकडून कपाशी लागवडीसाठी १५ जूनपर्यंत थांबविण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. ७ जूनपर्यंत १ लाख २१ हजार ८९८ मेट्रिक टन खताची जिल्ह्यात विक्री झाली असूृन, ७९ हजार ७२९ टन खतांची सध्या उपलब्धता आहे.
खरिपात ६ लाख ७५ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापेक्षा ६ हजार ६६४ अधिक लागवड कृषी विभागाने प्रस्ताविक केली असून, सर्वाधिक कापूस ३.९९ लाख हेक्टर, मका १.५५ लाख हेक्टर तर तूर ४२ हजार २००, तर तूर १० हजार १०० हेक्टरवर लागवडीचा अंदाज आहे. त्यासाठी ४३.३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी असून, ४१ हजार १४४ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे.
गेल्या हंगामात २ लाख ६८ हजार ८८९ मेट्रिक टन वापर झाला. यंदाच्या खरीप हंगामात १० टक्के खताचा वापर कमी करण्यासाठी २ लाख ५५ हजार ८१० मेट्रिक टन आवंटन मंजूर करण्यात आले. ७ जूृनपर्यंत २ लाख १ हजार ६२७ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यात ७३ हजार ८०८ मेट्रिक टन युरिया, तर संयुक्ते खतांचा ८१ हजार ७१० टन खतसाठा जिल्ह्यात उपलब्ध झाला. मंजूर आवटंनाच्या ८० टक्के खत उपलब्ध झाले तर त्यापैकी निम्म्याहून अधिक विक्री झाली असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते, तर ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर करून मिरची, टोमॅटो लागवडीला तुरळक सुरुवात झाल्याचे करमाड परिसरात दिसून आले, तर कपाशीसाठी १५ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी थांबण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
चौकट...
पीक विम्याच्या चाैकशीसाठी पथक सिल्लोडमध्ये दाखल
सिल्लोड तालुक्यातील पीक विम्यासंदर्भातील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चाैकशीसाठी पथक दाखल झाले आहे. पुण्याचे संख्याकी विभागाचे अधिकारी, नाशिकचे एक अधिकारी, पुणे येथील दक्षता पथकाचे अधिकारी, तसेच कृषी सह संचालक कार्यालयाचे अधिकारी असे चारजणांचे पथक सिल्लोडला चाैकशीसाठी गेले असून, चाैकशीनंतर ते अहवाल शासनाला सादर करतील. जिल्ह्यात खत विक्री चांगली झाली आहे. पेरणीला अद्याप अवकाश आहे, असे कृषी सहसंचालक डाॅ. दिनकर जाधव यांनी सांगितले.