औरंगाबाद- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दिक्षांत समारंभात पीएचडीचे ५६५, एमफिल ५, पदव्युत्तर पदवी २०२८ तर १ लाख २ हजार ८०९ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेने गुरूवारी मान्यता दिली. ऑक्टोबर २०२0 ते एप्रिल २०२१ दरम्यान झालेल्या परीक्षेतील एकुण १ लाख ५ हजार ४२४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक गुरूवारी पार पडली. पार पडलेल्या बैठकीस प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.सतीश देशपांडे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांच्यासह वित्त अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ येत्या १९ नोव्हेंबरला महाराष्ट्र भूषण, सुपर कॉम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यपाल, कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रांचे वितरण संबंधित महाविद्यालयात स्वतंत्र दीक्षात समारंभ घेऊन करण्यात येईल. १९ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात केवळ अर्ज केलेल्या पीएच.डी प्राप्त संशोधकांना पदवीचे वितरण होणार आहे. शनिवार पर्यंत हे अर्ज करता येणार आहे. विद्यापीठ मुख्य परिसरात पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी व एम.फिल. पदवीचे वितरण सभारंभाच्या दिवशी परीक्षा विभागात करण्यात येईल.
असे होईल पदवी वितरणविद्याशाखा -पीएच.डी -एम. फिल - पदव्युत्तर पदवी -पदवीविज्ञान आणि तंत्रज्ञान -१७० -०२ -९७१ -२६,७९७मानव्य विद्या -२०९ -२-७६५ -६३,५७८वाणिज्य आणि व्यवस्थापन -८२ -० -२०३ -८,८२९आंतरविद्या शाखेतील -१० -१ -१०९ -३६०५