औरंगाबाद : एटीएम सेंटरकरिता ओएलक्सवर जाहिरात टाकणे एका जणाला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी दुकान भाड्याने घेण्याची थाप मारून दुकानदाराला १ लाख ८० हजार ८२३ रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. या फसवणूकप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.तक्रारदार प्रशांत मधुकर अकोलकर यांनी दुकान एटीएमसाठी भाड्याने देण्याबाबत ओएलक्स या संकेतस्थळावर जाहिरात अपलोड केली.
जाहिरातीमधील नंबरवरून आरोपी विवेक पांडे (रा. बडोदा), आनंद वर्मा आणि दोन महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधून दुकान भाड्याने घेण्याची तयारी दर्शविली. दुकान भाडे आणि ठेव देण्याची तयारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. आरोपींनी दुकानाच्या मालकीहक्काची कागदपत्रे ऑनलाईन मागवून घेतली. करारनामा करणे आणि प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली तक्रारदार यांना त्यांच्या खात्यात ऑनलाईन १ लाख ८० हजार ८२३ रुपये टाकण्यास सांगितले. ही रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी तपास करीत आहेत.