वाळूज महानगर : अत्यल्प पावसामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यातही भीषण पाणीटंचाईचे संकट कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन एमआयडीसीच्या जलकुंभावरुन या टंचाईग्रस्त गावात दररोज १२५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, जिल्ह्यात बहुतांश तलाव व जलसिंचन प्रकल्प कोरडेठाक आहेत. नाशिक-नगर परिसरात झालेल्या पावसामुळे जायकवाडी प्रकल्प ९० टक्के भरला असला तरी या पाण्याचा उपयोग उद्योग व शहरातील पाणी पुरवठ्यासाठी गेला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनला आहे.
गंगापूर, खुलताबाद व जिल्ह्यातील इतर ठिकाणी नागरिकांना पावसाळ्यातही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरण मृत साठ्यात गेल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली होती. तीन आठवड्यांपूर्वी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात साठा झाला आहे.
मात्र, दुसरीकडे अत्यल्प पावसामुळे गंगापूर, खुलताबाद तसेच जिल्ह्यातील अनेक गावात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. टंचाईग्रस्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरवात केल्याची माहिती एमआयडीसीचे सहायक अभियंता प्रशांत सरग यांनी दिली.
या टंचाईग्रस्त गावांत टँकरभीषण पाणीटंचाई असलेल्या वाळूज परिसरातील एकलहेरा, नांदेडा, टाकळी कदीम,पोळ रांजणगाव बरोबर गंगापूर तालुक्यातील जिकठाण, मिर्झापुर, सुलतानाबाद, बाभुळगाव, आगाठाण, भागाठाण, पाच पीरवाडी, कोळघर, डोमेगाव, प्रतापपूर,दहेगाव, बोरगाव आदीसह जिल्ह्यात इतर टंचाईग्रस्त गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे.