छत्रपती संभाजीनगर : शहरातील कोट्यवधी रुपयांचे भूखंड महापालिकेने बीओटी (बांधा, वापरा अन् हस्तांतरित करा) या तत्त्वावर विकासकांना दिले. मागील दहा वर्षांत १० इमारती अपूर्णावस्थेत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना काही प्रकल्पांचा त्रास होत आहे. औरंगपुरा भाजीमंडई, जलतरण तलाव बंद, सिद्धार्थ उद्यानाचा प्रकल्प बांधूनही वापरात नाही ही वस्तुस्थिती आहे.
बीओटीचे प्रकल्प मंजूर करताना अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींना मोठी आकडेवारी दाखवून महापालिकेला कसा आर्थिक फायदा होईल हे पटवून दिले. १० वर्षे उलटले तरी प्रकल्प पूर्णच झाले नाहीत. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधींचा फटका बसत आहे. काही ठिकाणी आजही औपचारिक कामे करून ठेवली आहेत. दहा जागा बीओटी करारावर विकासकांना दिल्या आहेत. या जागांवर व्यावसायिक इमारती उभारून त्यापासून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळविणे अपेक्षित होते; मात्र यातील रेल्वे स्टेशनवरील व्यावसायिक इमारत व शहानूरवाडी येथील सचिन मुळे यांनी विकसित केलेले श्रीहरी पॅव्हेलियन या दोनच जागा विकसित झाल्या. हा प्रकल्पही महापालिकेने परत घेतला. बीओटी विभागाचा कारभार सुरुवातीला सिकंदर अली यांनी अनेक वर्षे सांभाळला. त्यांच्याच हातावर हे प्रकल्प विकासकांना देण्यात आले. आता कार्यकारी अभियंता राजू संधा यांच्याकडे हा विभाग देण्यात आला आहे.
सिद्धार्थ उद्यानाचा वाद गंभीरसिद्धार्थ उद्यानाच्या दर्शनी भागात ८० गाळ्यांचे व्यापार संकुल उभारले. दोन विकासकांतर्गत वादामुळे गाळ्यांचे वाटप रखडले आहे. प्रकल्पाचा विकासक कोण? भागीदारांना आपला वाटा मिळेना, अशी अवस्था आहे. प्रशासनाने गाळेवाटपास स्थगिती दिली. त्यामुळे विकासकांना महापालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
या दहा जागांवर बीओटीचा प्रकल्प सुरू१. औरंगपुरा भाजी मंडई – मागील दहा वर्षांपासून प्रकल्प रखडला२. ज्योतीनगर जलतरण तलाव – काम पूर्ण; पण वादामुळे बंद३. शहागंज भाजीमंडई – प्रकल्प रद्द करण्यात आला४.रेल्वे स्टेशन व्यापारी संकुल – काम पूर्ण, बहुतांश गाळे विकले गेले.५. शहानूरवाडी श्रीहरी पॅव्हेलियन – वर्षभरापूर्वी साडेपाच कोटी रुपये देऊन महापालिकेने जागा परत घेतली.६. सिद्धार्थ गार्डन – विकासकांच्या वादात गाळेविक्री थांबली, ८० गाळे तयार.७. कॅनॉट प्लेस परिसरातील स्पोर्ट कॉम्प्लेक्स – काम पूर्ण८. वसंत भवन शॉपिंग मॉल – दहा वर्षांपासून काम सुरू; मात्र एका डीपीमुळे काम बंद९. पडेगाव येथील कत्तलखाना – कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, दुसऱ्या टप्प्याची प्रगती नाही.१०. वेदान्तनगर जलतरण तलाव व जिम – काम अंतिम टप्प्यात.