औरंगाबाद : शहरातील बँकांच्या पाच करन्सीचेस्टमध्ये आजघडीला १० रुपयांची तब्बल १० कोटींची नाणी साचली आहेत. याशिवाय सार्वजनिक बँकांच्या प्रत्येक शाखेमध्येही नाणी शिल्लक आहेत. ही सर्व नाणी दैनंदिन व्यवहारात येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ अफवेमुळे विशेषत: ग्रामीण भागात लोक १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यात नवीन नाणी चलनात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी व्यवहारात आहेच आता स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा २० रुपयांची नाणी येत आहेत.
रिझर्व्ह बँकेनेही याआधी १० रुपयांची नाणी चलनात आहे, असे अनेकदा जाहीर केले आहे. मात्र, तरीही शहराबरोबरच ग्रामीण भागात अनेक लोक दैनंदिन व्यवहारात १० रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे बँकेतील नाण्यांच्या वाढत्या साठ्यावरून लक्षात येत आहे. १० रुपयांची नाणी बंद झाली, अशी अफवा दोन वर्षांपूर्वी पसरली आणि अजूनही त्या अफवेचे भूत बाजारपेठेत कायम आहे. यामुळे बँकांच्या शाखांमध्ये लोक १० रुपयांची नाणी जमा करीत आहेत. जिल्ह्यातील बँकांमध्ये जमा झालेली नाणी अखेर शहरातील पाच बँकांच्या करन्सीचेस्टमध्ये येत आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शहरात दोन करन्सीचेस्ट आहे. त्यातील एक दुधडेअरी चौकात आहे. तिथे आजघडीला १० रुपयांची ५ कोटी ५० लाख रुपये मूल्यांची नाणी तिजोरीत पडून आहे. तसेच शहागंजातील दुसऱ्या करन्सीचेस्टमध्ये १० रुपयांची २ कोटी २६ लाख रुपये मूल्यांची नाणी साचली आहेत.
याशिवाय बँक आॅफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक व आयडीबीआय बँक यांचे करन्सीचेस्ट आहेत. सर्व बँकांच्या करन्सीचेस्टमध्ये मिळून आजघडीला १० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्यांची १० रुपयांची नाणी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाणी साठल्याने व्यवस्थापनाला चिंता पडली आहे. कारण, बँकेत नाणी जमा होत आहे; पण घेऊन जाण्यासाठी कोणी येत नाही. बँकांचे अधिकारी सर्वांना सांगत आहेत की, १० रुपयांची नाणी चलनात आहेत. मात्र, ग्राहक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात साचलेल्या नाण्यांचे करायचे काय असा यक्षप्रश्न बँकांसमोर पडला आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे बँक अधिकाऱ्यांचे आवाहनसार्वजनिक क्षेत्रातील नव्हे, तर खाजगी बँका, तसेच नागरी सहकारी बँकांमध्येही १० रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात आहे. देवगिरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या सर्व शाखा मिळून सुमारे ८ लाख मूल्यांची १० रुपयांची नाणी शिल्लक आहे. औरंगाबादसारखेच परभणी जिल्ह्यातही नागरिक अफवांचे बळी पडत असून, तेथेही १० रुपयांची नाणी व्यवहारात नागरिक स्वीकारत नाहीत. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नका, नाणी चलनात आहेत, असे आवाहन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
नाणी जड असल्याचे कारण१० रुपयांची नाणी बंद झाली ही अफवा ग्रामीण भागातून दोन वर्षांपूर्वी शहरात आली होती. शहरातही काही भागांत नाणी घेतली जात नव्हती. मात्र, रिझर्व्ह बँकेने नाणी चलनात असल्याचे जाहीर केले व वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या. यामुळे शहरातील मोंढ्यात, जाधववाडी व अन्य बाजारपेठांत १० रुपयांची नाणी चालू लागली, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, ग्रामीण भागात अजूनही १० रुपयांची नाणी लोक स्वीकारत नाहीत. कारण, नाणी जड आहे. चार-पाच नाणी खिशात असेल, तर खिसा फाटतो, असे ग्राहक सांगतात.
नाणी व्यवहारात वापरा एसबीआयच्या शहागंज शाखेचे मुख्य व्यवस्थापक शाहिद कमाल यांनी सांगितले की, १० रुपयांची नाणी चलनात आहेत. नाणी बँकेत आणण्यापेक्षा लोकांनी ती दैनंदिन व्यवहारात चालवावीत. व्यापाऱ्यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करावा.